Wed, Jul 17, 2019 08:18होमपेज › Belgaon › तीस दिवसांत मिळणार बांधकाम परवाना

तीस दिवसांत मिळणार बांधकाम परवाना

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

शहर आणि ग्रामीण भागात घर बांधकाम, भू-परिवर्तन, वसाहतीच्या आराखड्याला मंजुरीसाठी एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यासंबंधीचे कोणतेही अर्ज 30 दिवसांत निकाली लावले जाणार आहेत.नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी याबाबतची माहिती नुकतीच बंगळूर येथे जाहीर केली. कोणतेही बांधकाम असो की त्यासंबंधीची कामे असोत, एकूण 16 एजन्सीकडून परवानगी घ्यावी लागते. यामध्ये भरपूर वेळ खर्ची पडतो. शिवाय एका दिवसात सर्व परवाने मिळतील, याची शक्यता कमी असते. अनेकदा सरकारी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत असल्याने पैसाही खर्च होतो.
याकरिता ऑनलाईन अर्जाची व्यवस्था जारी करण्यात आली आहे. विभागीय नियंत्रण नियम आणि उपकायद्यानुसार अर्ज असतील तर ते तात्काळ स्वीकारले जातात. इमारतीच्या आराखड्याला देण्यात येणारे मंजुरीपत्र 30 दिवसांत घरापर्यंत पोचते.

केवळ 30 बाय 40 आकाराच्या प्लॉटमध्ये बांधकाम करावयाचे असेल, तर तात्काळ परवानगी दिली जाते. 60 बाय 40 आकारच्या भूखंडावर बांधकामासाठीही तात्काळ परवानगी देण्यासाठी सरकारकडून विचार केला जात आहे.इमारत बांधकाम आराखड्याला संबंधितांकडून 7 दिवसांत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अन्यथा परवाना मिळाल्याचे गृहित धरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. एक खिडकी व्यवस्थेसाठी आयडीएस टेक्नॉलॉजीजकडून 7.47 कोटी रुपयांत सॉफ्टवेयर तयार करण्यात आले आहे. लवकरच ही व्यवस्था लागू होणार आहे.

924 संस्था काळ्या यादीत

रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार (रेरा) नोंदणी न करताच रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्‍या 924 संस्थांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रेरामध्ये नोंद नसणार्‍या 1,626 संस्थांना नोटीस जारी करण्यात आली होती. त्यापैकी 604 संस्थांनी नोटिशीला उत्तर दिले आहे. त्यामुळे 924 संस्थावर कारवाई होणार आहे.