Wed, Apr 24, 2019 19:38होमपेज › Belgaon › सीमावासीयांकडून संस्कृतीचे जतन : खोत

सीमावासीयांकडून संस्कृतीचे जतन : खोत

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:41PMजांबोटी : वार्ताहर

बेळगाव-खानापुरातील सीमाबांधवांकडूनच खर्‍या अर्थाने मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन होत असल्याचे मत महाराष्ट्राचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडले. 

बेटगेरी (ता. खानापूर) येथे पार पडलेल्या श्री सातेरीदेवी मंदिराच्या जीर्णोध्दार कॉलम भरणीप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी गुरव होते. व्यासपीठावर माजी मंत्री भरमू पाटील, आ. अरविंद पाटील, जि. पं. सदस्य नारायण कार्वेकर, बाबुराव देसाई, सभापती नंदा कोडचवाडकर, चंदगड सभापती जगन्नाथ हुलजी, गोपाळ पाटील, भाजप प्रधान सचिव मारुती पाटील, ग्रा. पं. सदस्य पुंडलिक पाटील उपस्थित होते.

मंत्री खोत शेतकरी चळवळींची आठवण करून देताना  म्हणाले, शेतकरी हा राजा असून, त्याच्या जीवावरच इतर जनता जगत असल्याचे सांगितले. सीमाभागातील सांस्कृतिक विकासासाठी भरीव निधीबाबत प्रयत्न करण्याबरोबर सीमाप्रश्‍नासाठी लागणारे सहकार्य करू. सीमा प्रश्‍नाबाबत महाराष्ट्र नेहमीच थोरल्या भावाप्रमाणे उभा आहे. 

मंत्री खोत यांनी सीमाप्रश्‍नाचे नेतृत्व स्वीकारावे. सीमाभागातील वाचनालये, सांस्कृतिक विकास साधण्यासाठी निधी मिळवून देण्याचे आवाहन आ. अरविंद पाटील यांनी केले. बेटगेरीसह तालुक्यात कोणत्याही गावात धार्मिक अथवा नागरी विकास करण्यास कमी पडलो नसल्याचे नमूद केले. 

भरमू पाटील म्हणाले, आपण सीमाभागातील असून येथील समस्या महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहचवण्याचे काम करू. मान्यवरांच्या हस्ते  विविध फोटो व कॉलम भरणीचे उद्घाटन करण्यात आले.  श्रीपाद भरणकर यांनी स्वागत करून नंतर आभार मानले.