Fri, Jul 19, 2019 16:04होमपेज › Belgaon › काँग्रेसला अजूनही लागलीय 'ऑपरेशन कमळ'ची भीती

काँग्रेसला अजूनही लागलीय 'ऑपरेशन कमळ'ची भीती

Published On: May 21 2018 7:45PM | Last Updated: May 21 2018 7:45PMबंगळूर : प्रतिनिधी

भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस-निजद युती सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी अजून काँग्रेसला ऑपरेशन कमळची भीती आहे. आमदारांना ओढण्यासाठी भाजप अजूनही प्रयत्नशील असल्याचे काँग्रेसचे म्हणणे असून, त्यामुळेच काँग्रेसने आपल्या सार्‍या आमदारांना अजूनही रिसॉर्ट-हॉटेलमध्येच ठेवले आहे.बी. एस. येडियुराप्पांना तीनच दिवसांत राजीनामा द्यावा लागल्यामुळे भाजप व्यथित आहे. जखमी वाघाप्रमाणे प्रतिस्पर्धी आमदारांची शिकार करण्यासाठी तो उत्सुक आहे. काही दिवस शांत राहून भाजप पुन्हा वार करेल, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळेच येडिंनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या मतदारसंघात परतलेल्या काही आमदारांना काँग्रेसने पुन्हा बंगळूरला बोलावले असून, हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यांना कुणाही अनोळखीला भेटू दिले जात नाही.

कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन बहुमत सिद्ध करेपर्यंत सारे काँग्रेस आमदार बंगळूरमध्येच राहणार आहेत. त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आणि त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी काँग्रेस-निजद युतीचे सूत्रधार डी. के.शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.आणखी किमान तीन दिवस आमदार हॉटेलमध्येच राहतील, असे शिवकुमारांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांसाठी मतदारसंघात जाणे आणि परत येणे यामध्ये त्रासच अधिक आहे, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्येच थांबण्याची सूचना देण्यात आल्याचे शिवकुमार म्हणाले. कुमारस्वामी बुधवारी शपथ घेण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे सारे 78 आमदार हिल्टन गाल्फलिंक्स हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. 

2008 मध्ये भाजपने सत्तास्थापनेनंतर ऑपरेशन कमळ राबवून 18 आमदारांना फोडले होते. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील भालचंद्र जारकीहोळ्ळी आणि कारवार जिल्ह्यातील सुनील हेगडे यांचाही समावेश होता. यंदाही भाजपने कारवार जिल्ह्यातील हेब्बार या आमदाराला फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच भाजपचे नेते हेब्बार यांच्या पत्नीशी बोलतानाची ध्वनिफित प्रसिद्ध केली होती. 

लॉबिंग नको

मंत्रिपदासाठी लॉबिंग करू नका, पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे, तिची तयारी करा असा स्पष्ट आदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतून बंगळूरमधील आमदारांना दिला आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस पिछाडीवर आहे, तेथे काय रणनीती आखता येईल, हे ठरवा. मंत्रिपदाच्या मागे लागून लोकसभेची तयारी अधांतरी सोडू नका, असे स्वतः सोनिया गांधींनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या लोकसभेत काँग्रेसला देशात सर्वाधिक म्हणजे 9 खासदार कर्नाटकाने दिले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा वाढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.