Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Belgaon › काँग्रेस-निजद बैठक : काँग्रेसची यादी घेऊन ज्येष्ठ नेते दिल्‍लीला

मंत्रिमंडळ विस्तारावर खल

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 26 2018 11:57PMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेसला 22 आणि निजदला 12 मंत्रिपदे या सूत्रानुसार कोणती खाती कुणाला द्यायची, यावरून काँग्रेस आणि निजदची बैठक सायंकाळी झाली. पण निर्णय गुप्त राखण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या इच्छुकांची यादी घेऊन पक्षाध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, गृहखाते काँग्रेसला मिळणार आहे. तर महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी निजदने हट्ट धरला आहे. अर्थ खाते मुख्यमंत्री कुमारस्वामी स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्रिपद दोन पक्षांना विभागून मिळेल. उच्च शिक्षणमंत्री व प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री अशी दोन खाती दोन मित्रपक्षांमध्ये विभागली जातील.

तथापि, अंतिम यादी राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतरच निश्चित होईल, असे संकेत उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी शनिवारच्या बैठकीनंतर दिले. त्यांच्यासह काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते एस. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना झाले आहेत. रविवारी ते राहुल यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ निश्चित होण्याचे संकेत आहेत.
बैठकीला मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांच्यासह शिवकुमार, निजद नेते एच. डी. रेवण्णा, जी. टी. देवैगौडा आदि उपस्थित होते. जिल्हानिहाय आणि जातनिहाय मंत्रिपदांचे वाटप कसे करावे, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. एक मंत्रिपद जारकीहोळी बंधूंना तर दुसरे महिलेला मिळेल. त्यात सतीश जारहीकोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांची नावे आघाडीवर आहेत.

1 जून रोजी होणार्‍या कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दलही चर्चा करणार आहेत. त्या बैठकीमध्ये नूतन प्रदेशाध्यक्ष पदाकरिताही चर्चा केली जाणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्त्वाखाली चार वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्या कालावधीत त्या सरकारची फलनिष्पत्ती शून्य असल्याची टीकाही जी. परमेश्‍वर यांनी केली आहे.

इच्छुकही दिल्‍लीत

मंत्रिमंडळात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह एम. बी. पाटील, दिनेश गुंडुराव, एच. के. पाटील, एस. आर. पाटील यांचा समावेश असून ते सध्या दिल्‍लीमध्ये आहेत.