Wed, Aug 21, 2019 03:08होमपेज › Belgaon › काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:00PMनिपाणी : विठ्ठल नाईक

यंदाची विधानसभा निवडणूक निपाणी विधानसभा मतदारसंघासाठी प्रतिष्ठेची आणि अस्मितेची ठरली. तीन माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष व नेतेमंडळींनी काँग्रेसतर्फे भाजपच्या शशिकला जोल्‍ले यांच्यासमोर कडवे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पेलत जोल्‍ले यांनी दुसर्‍यांदा विजय मिळविला. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा पराभव पत्करावा लागल्याने आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या बाजूने एकीच्या लढ्याला अपयश आल्याने पुन्हा भाजपचा विजय झाला. काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी या तीन माजी आमदारांसह खासदार प्रकाश हुक्केरी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक व नेतेमंडळींनी एकोप्याने भाजपच्या पाडावासाठी प्रयत्न केले. काँग्रेसला यंदा विजय सूकर वाटत असताना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला.

भाजपने सुरुवातीपासून गावागावात प्रचारफेर्‍या काढून कार्यकर्त्यांना एकवटण्याचा प्रयत्न केला. विकासकामांच्या जोरावर विजयाची शिदोरी मतदारांकडे मागण्यात आली. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून विजयाची उत्तम व्यूहरचना भाजपची दिसून आली. काँग्रेस नेत्यांनी एकोप्याच्या जोरावर शाश्‍वत कामांची उदाहरणे मतदारांसमोर ठेवून मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मतदारांनी भाजपलाच आणखी संधीचा कौल दिला.

काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचा करिष्मा दाखविण्याचा मोठा प्रयत्न झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांसह कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींना सभा घेत ताकद एकवटली. भाजपनेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले होते. पण ऐनवेळी सभा झाली नाही. केवळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या.

निवडणूक काळात सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेसने विजयाचे वातावरण तयार केले. निपाणी शहरात शक्‍तिप्रदर्शनातून जणू शहर काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले. पण शेवटी मतांचे गणित पाहता अपेक्षित मतदान निपाणीतून काँग्रेसला दिसून आले नाही. शहरातूनही भाजपला सुमारे 45 टक्के मते खेचण्यात यश मिळाले. काँग्रेसला हा लढा धनशक्‍तीविरोधात जनशक्‍तीचा असल्याचे सांगत निवडणूक लढविली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीचा निकाल हाती येताच काँग्रेसच्या एकीच्या लढ्याला अपयश आल्याचे दिसून आले. त्यानंतर निवडणुकीत पैशाचे राजकारणही मोठ्याप्रमाणात झाल्याच्या चर्चा ऐकावयास मिळाल्या. पण निपाणी मतदारसंघात गतवेळी पहिल्यांदा निवडून आलेल्या विद्यमान आमदार तीन माजी आमदारांचे आव्हान पेलत भारी ठरल्याच्या चर्चाही ऐकावयास मिळाल्या. भाजप नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी विकासकामांच्या जोरावर भाजपला गड कायम राखण्यात यश मिळाल्याचे सांगितले. यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेसला आत्मपरीक्षणाची ठरली आहे.

सन 1999 पासूनचा इतिहास कायम

कर्नाटक राज्यात 1999 पासूनचा इतिहास पाहिल्यास निपाणी विधानसभा मतदारसंघाचा आमदार राज्यात सत्तेवर येणार्‍या सरकारच्या विरोधी बाकावर बसतो. यंदा भाजपला अधिक जागा मिळाल्याने येडियुराप्पांच्या शपथविधीनंतर इतिहास बदलेल, असे वाटत होते. पण बहुमत दाखविण्यावेळी येडियुराप्पांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-निजद सरकार सत्तेत येणार असल्याने यंदाही निपाणीचा आमदार विरोधी बाकावर बसण्याचा इतिहास कायम राहिला आहे.