खानापूर : प्रतिनिधी
विकासाच्या दिशेने झेपावणार्या कर्नाटकाला अधोगतीकडे नेण्याचे काम काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने केले. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन राहुल गांधींची तिजोरी भरण्यावरच सिद्धू सरकारने भर दिला. सत्तेचा दुरुपयोग करुन राज्याला भ्रष्टाचाराचा अड्डा बनविला असून कर्नाटकला काँग्रेसचे एटीएम होण्यापासून रोखण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
खानापूर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील होते. व्यासपीठावर खा. सुरेश अंगडी, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबुराव देसाई आदी होते.
कर्नाटकाच्या विकासासाठी केंद्र सरकार देत असलेल्या निधीवर राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यानी डल्ला मारल्याने गरीबांपर्यंत तो पैसा पोहचलाच नसल्याचा आरोप योगींनी केला. भाजपचे स्थानीक उमेदवार विठ्ठल हलगेकर पेशाने शिक्षक असल्याने अशा स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला जनता लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच स्वीकारेल. असा आशावाद योगींनी व्यक्त केला. यावेळी खा. सुरेश अंगडी, विठ्ठल हलगेकर यांचीही भाषणे झाली आहे.