Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Belgaon › शिमोगा : लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास काँग्रेस नेते नाखूश

शिमोगा : लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास काँग्रेस नेते नाखूश

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 11:16PMशिमोगा : प्रतिनिधी 

शिमोगाची लोकसभा पोट निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात होणार असून ती लढविण्यासाठी काँग्रेस उमेदवार नाखूष आहेत. बी. एस. येडियुराप्पा यांनी येथून खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. 

शिमोगा लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 17 पैकी 12 वेळा येथून काँग्रेस उमेदवार विजयी होत आला आहे. भाजपने येथून चार वेळा विजय मिळविला आहे. तर बंगारप्पा समाजवादी पक्षाच्या तिकिटावरून एकदा निवडून आले आहेत. 1952 नंतर आता  होणारी पोटनिवडणूक ही दुसरी असेल. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावरून एस.  बंगारप्पा निवडून आले होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने 2005 मध्ये पोटनिवडणूक झाली. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरून विजय मिळविला होता. तब्बल 12 वेळा निवडणुका जिंकूनही यावेळी काँग्रेसला येथून उमेदवार मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. 

काँग्रेसने यापूर्वी मंजुनाथ भंडारी यांना रिंगणात उतरविले होते. परंतु भाजपचे बलाढ्य उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांचा पराभव केला होता. तरीही भंडारी यांनी मतदार संघातील काही भागातून चांगली मते मिळविली होती. 

आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिल्यास पुन्हा ताकदीने उभा राहीन, असे भंडारी यांनी म्हटले आहे. ही पोटनिवडणूक केवळ नावालाच आहे. कारण येथून निवडून येणार्‍या खासदाराचा कार्यकाळ केवळ आठ ते दहा महिन्याचा असेल. यामुळेच काँग्रेसमधून कोणी इच्छुक नसल्याचे समजते. उच्च न्यायालयातील नामवंत वकील आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते के. दिवाकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे. 2014 मध्ये काँग्रेसकडून तिकिट मिळण्यासाठी दिवाकर यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु दिवाकर हे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे कायदा सल्लागार होते. त्यामुळे त्यांना काँग्रेसने संधी नाकारली. दिवाकर हे मुळचे सागर तालुक्यातील आहेत. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कागोडु तिम्माप्पा यांच्याशी दिवाकर यांचे उत्तम संबंध आहेत. राज्यात निजद आणि काँग्रेस युती असल्याने या पोटनिवडणुकीसाठी निजदने समर्थन द्यावे, असा आग्रह काँग्रेस करू शकते.