Wed, Jul 24, 2019 05:41होमपेज › Belgaon › राज्य पुनर्रचनेनंतर काँग्रेसचा पहिला विजय 

राज्य पुनर्रचनेनंतर काँग्रेसचा पहिला विजय 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:26PMखानापूर : प्रतिनिधी

1956 च्या राज्य पुनर्रचनेनंतर काँग्रेसला न भेदता आलेला राज्यातील एकमेव म्हणून खानापूर विधानसभा मतदार संघाची ख्याती होती. नानाविध प्रयत्न करुनही येथील मतदारराजाने कित्येकदा काँग्रेसला हुलकावणी दिल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र म. ए. समिती आणि भाजपमधील दुहीचा सरळ लाभ काँग्रेसला झाल्याने 66 वर्षानंतर खानापुरात हाताला लोकबळ मिळाल्याचे दिसून आले.

काँग्रेसच्या लाटेत राज्यात अनेकवेळा बडेबडे बुरुज ढासळले. मात्र, त्याला खानापूर मतदारसंघाचा अपवाद होता. 1952 साली मुंबई प्रांतात झालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे कै. बसाप्पना अरगावी निवडून आले होते. त्यानंतर 1956 साली झालेल्या राज्य पुनर्रचनेत मराठीबहुल भागावर अन्याय झाला. साहजिकच काँग्रेसमुळेच मराठी भाषिकांना कानडी राज्यात डांबण्यात आल्याची भावना सर्वत्र निर्माण झाल्याने येथील जनतेने त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत म. ए. समितीच्या उमेदवारांना कौल दिला. त्याला 2008 च्या एकमात्र निवडणुकीचा अपवाद होता.

यावेळच्या निवडणुकीत काँग्रेससमोर भाजप, निजद या राष्ट्रीय पक्षांसह म. ए. समितीचे तगडे आव्हान उभे ठाकले होते. खरेतर 2013 च्या निवडणुकीत डॉ. अंजली निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावले होते. त्यावेळी जनतेने त्यांना नाकारले होते. 2013 च्या निवडणुकीत जे भाजप-काँग्रेसच्याबाबतीत घडले. ते यावेळी म. ए. समितीच्याबाबतीत घडताना दिसले. तेव्हा भाजप आणि कजप यामध्ये मतांची विभागणी झाली होती. तर काँग्रेसचेही दोन उमेदवार राहिल्याने मतविभागणीचा सरळ लाभ म. ए. समितीचे अरविंद पाटील यांना झाला होता.

यावेळी नेमकी हीच परिस्थिती समिती आणि भाजपमध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. म. ए. समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज 45 हजार इतकी आहे. तर भाजपचे विठ्ठल हलगेकर आणि असंतूष्ट उमेदवार जोतिबा रेमाणी या दोघांच्या मतांची बेरीज 37 हजार 414 इतकी होते. ही दोन्ही आकडेवारी डॉ. निंबाळकर यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय एकच उमेदवार रिंगणात असता तर सांघिक प्रचारामुळे समिती व भाजपच्या मतांमध्ये आणखी वाढ झाली असती.

तिसर्‍या क्रमांकावर राहिलेले निजदचे नासीर बागवान यांनीही बर्‍यापैकी मराठी मतदारांना आपल्या बाजूने वळविल्याने त्यांना 27 हजाराच्या वर मजल मारता आली. एकंदर काँग्रेसचा विजय हा त्यांच्या सांघिक कामगिरीपेक्षा विरोधकांच्या फुटीर वृत्तीमुळे सहज शक्य झाल्याचे बोलले जात आहे.