होमपेज › Belgaon › कर्नाटकात काँग्रेसला कौल

कर्नाटकात काँग्रेसला कौल

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 10:23AMबंगळूर : प्रतिनिधी

तीन महानगरपालिकांसह राज्यातील 105  नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतदारांनी काँग्रेसला कौल दिला आहे. सर्वाधिक 32 नागरी संस्थांवर काँग्रेसने वर्चस्व राखले असून, सर्वाधिक उमेदवारही काँग्रेसचेच निवडून आले आहेत. भाजपने काँग्रेसला कडवी लढत दिली; मात्र त्यांना 28 नागरी संस्थांच्या सत्तेसह दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. निजद 13 नागरी संस्थांवर वर्चस्व मिळवून तिसर्‍या क्रमांकावर राहिला. अपक्ष आणि इतर उमेदवारांमुळे 33 नागरी संस्थांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे.

गेल्या मेमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांवरही भाजपचे वर्चस्व राहील, असा अंदाज वर्तवला जात होता; मात्र मतदारांनी तो अंदाज फोल ठरवताना सोमवारी काँग्रेसला कौल दिला. 

राज्यभरात नगरसेवकपदाच्या एकूण 2,666 जागांपैकी काँग्रेसला 1003, तर  भाजपला 923 जागा मिळवता आल्या. निजदने 377 आणि अपक्षांनी 315 जागा पटकावल्या. काँग्रेसने संपूर्ण राज्यात वर्चस्व सिद्ध करताना सर्वाधिक जागा मिळविल्या. पण, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांच्या तुमकूर जिल्ह्यात पक्षाला फटका बसला. या ठिकाणी निजदने सर्वाधिक जागा मिळविल्या. किनारपट्टी, उत्तर कर्नाटकासह काही ठिकाणी भाजप उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले. जुन्या म्हैसूर भागातील मंड्या, तुमकूर, हासनमध्ये निजदने वर्चस्व राखले.

संस्थानिहाय

29 नगरपालिकांपैकी 9 काँग्रेस, 5 भाजप आणि 2 पालिका निजदला मिळाल्या. 13  पालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. 20 नगर पंचायतींपैकी  काँग्रेस, भाजपला प्रत्येकी 7, निजदला 2 आणि 4 पंचायती त्रिशंकू  राहिल्या. 53 नगर परिषदांपैकी 20 काँग्रेस, 11 भाजप, 8 निजद आणि 14 परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. एकूण 32 ठिकाणी काँग्रेस, 28 भाजप, 12 निजद आणि 33 ठिकाणी त्रिशंकू स्थिती असून तेथे आघाडी करणे अनिवार्य आहे.

तीन महापालिका

तीन महापालिकांमधील 135 प्रभागांपैकी 36 काँग्रेस, 54 भाजप, 30 निजद आणि अपक्ष 15 अशा जागा मिळाल्या. नगरपंचायतीतील 358 जागांपैकी 141 काँग्रेस, 129 भाजप, 29 निजद आणि 59 अपक्ष विजयी झाले. नगर पालिकेतील 926 प्रभागांतील काँग्रेस 294, भाजप 355, निजद 107 आणि अपक्ष 170 निवडून आले. नगर पंचयतींच्या 1,247 प्रभागांमध्ये 532 काँग्रेस, 389 भाजप, 211 निजद आणि 115 अपक्ष उमेदवार विजयी झाले.