Sun, Apr 21, 2019 06:06होमपेज › Belgaon › काँग्रेसची तीन जागांवर बाजी

काँग्रेसची तीन जागांवर बाजी

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 24 2018 1:46AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेसच्या दोन आमदारांनी आधी केलेले क्रॉस-व्होटिंग (दुसर्‍या पक्षाच्या उमेदवाराला मतदान) आणि त्यानंतर चुकीची केलेली दुरुस्ती यामुळे गोंधळात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अखेर काँग्रेसची अपेक्षित सरशी झाली. काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी झाले, तर चौथी जागा अपेक्षेप्रमाणे भाजपने जिंकली. निजदने मतदानावर ऐन वेळी बहिष्कार टाकला.

काँग्रेसचे डॉ. एल. हनुमंतय्या, डॉ. नासिर सय्यद हुसेन, जी. सी. चंद्रशेखर आणि भाजपचे राजीव चंद्रशेखर यांनी निवडणुकीत विजय मिळवला. निजदचे एम. बी. फारुक यांच्या पक्षाने थोड्या मतदानानंतर बहिष्कार टाकल्याने त्यांनी पराभव स्वीकारावा लागला. संभाव्य एकूण 225 आमदारांपैकी 188 आमदारांनीच राज्यसभेसाठी मतदान केले. निजदच्या 37 आमदारांनी मतदानच केले नाही.
जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 44  मते आवश्यक होती.

त्यानुसार काँग्रेसचे जी. सी. चंद्रशेखर यांना 46, एल. हनुमंतय्या यांना 44, सय्यद नासिर हुसेन यांना 42, तर भाजपचे राजीव चंद्रशेखर यांना 50 मते पडली. निजदचे एम. बी. फारुख यांना 2 मते मिळाली. तर चार मते रद्दबातल ठरवण्यात आली. निजदच्या आमदारांनी मतदानच केले नाही. एकूण 122 आमदार असलेल्या काँग्रेसचे दोन उमेदवार आणि 43 आमदार असलेल्या भाजपचा एक उमेदवार निवडून येणार हे निश्‍चित होतेच. चौथ्या जागेसाठी 37 आमदार असलेले निजद आणि काँग्रेस यांच्यात लढत होती. मात्र, निजदने मतदानावर अर्ध्यावरच बहिष्कार घातल्याने काँग्रेसचा मार्ग सुकर झाला.

 

Tags : Karnataka, Rajya Sabha elections, Congress candidate, Win,