Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Belgaon › ‘चंचल’ आमदारांवर होते काँग्रेसचे लक्ष

‘चंचल’ आमदारांवर होते काँग्रेसचे लक्ष

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:09PMबंगळूर : प्रतिनिधी

बी. एस. येडियुराप्पा यांनी  विधानसभेमध्ये विश्‍वासदर्शक ठराव मांडलाच तर त्यांच्या गळाला लागणार्‍या आमदारांची माहिती काँग्रेस-निजदच्या नेत्यांना आधीच कळली होती.  त्यामुळे त्या आमदारांवर काँग्रेस निजदच्या नेत्यांनी खास लक्ष केंद्रीत केले होते. येडियुराप्पा यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे कोण आमदार भाजपच्या आमिषांना बळी पडू शकता, हे समोर आले नाही.

काँग्रेस -निजदने आपल्या आमदारांची संयुक्त यादी तयार केली होती. तीच यादी आता एच. डी. कुमारस्वामी यांच्यावरील विश्‍वासदर्शक ठरावासाठी सादर करण्यात आलेली आहे. ही यादी तयार करताना भाजपच्या गळाला लागलेल्या आमदारांची नावे काँग्रेस-निजदला माहिती होती. फुटीर आमदारांची यादी त्यांनी तयार ठेवली होती. भाजपतर्फे आमदार फोडाफोडी करण्याच्या ध्वनिफिती काँग्रेस उघड करण्याच्या तयारीत होती. तरीसुद्धा भाजपला बहुमत सादर करण्याइतके  आमदार मिळाले नव्हते. हे काँग्रेसला माहिती झाले होते. केवळ त्यांना दोनच आमदारांचा पाठिंबा मिळणार होता. त्यामुळे विश्‍वासदर्शक ठराव अयशस्वी होणार हे स्पष्ट झाल्यामुळेच येडियुराप्पांनी ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा  राजीनामा राज्यपालांकडे जाऊन दिला आणि काँग्रेसनेही यादी तशीच ठेवली.