Sun, Jul 12, 2020 21:03होमपेज › Belgaon › कर'नाटका'मध्ये होणार तरी काय? विश्वासदर्शक ठराव नाहीच; कामकाज स्थगित

कर'नाटका'मध्ये होणार तरी काय? विश्वासदर्शक ठराव नाहीच; कामकाज स्थगित

Published On: Jul 19 2019 8:16PM | Last Updated: Jul 19 2019 8:38PM
बेंगळुरू : पुढारी ऑनलाईन

गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला कर्नाटकमधील राजकीय तमाशा आजही कायम राहिला. त्यामुळे कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार जाणार की राहणार या मुद्यावरून आजही संभ्रम कायम राहिला. विधानसभा सभापती केआर रमेश यांनी सोमवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव आता सोमवारीच मांडला जाईल अशी चिन्हे आहेत. सोमवारी सकाळी ११ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले आहे. 

राज्यपाल गजुभाई वाला यांनी दोनवेळा पत्र लिहूनही मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडू शकले नाहीत. आजही संपूर्ण दिवसभर चर्चाच होत राहिल्या. राज्यपालांनी आज सायंकाळी सहापर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडावा असे पत्र लिहून कुमारस्वामी यांना कळवले. कुमारस्वामी यांनी या पत्रावरून दुखावलो असल्याची प्रतिक्रिया दिली. 

कुमारस्वामी यांनी राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या आमदारांना  व्हिप बजावण्याचा अधिकार आहे, तो कोणत्याही न्यायालयाकडून काढून घेता येत नाही. तसेच विधान सभेचे सत्र सुरू असताना राज्यपाल विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी डेडलाईन  देऊ शकत नाही या दोन मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही सभापतींचा आदर करतो. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव आज मांडला असे सांगितले होते. आम्ही मध्यरात्रीपर्यंत शांतपणे बसण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे कितीही वेळ लागला, तरी चालेल काही अडचण नाही. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशाचाही आम्ही सन्मान करत असल्याचे दिसून येईल. 

चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच काँग्रेस आणि जेडीएसने कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. ही मागणी सभापती के. आर रमेश यांनी फेटाळून लावली. जगाचा सामना करावा लागेल असे सांगत त्यांनी स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.

रमेश यांनी बंडखोर आमदारांवरही माहिती दिली. ते म्हणाले, जनता सर्वोच्च न्यायालय तसेच सभागृहाला माहिती देऊ इच्छित आहे, की कोणत्याही आमदाराने  माझ्याकडे संरक्षण मागण्यासाठी पत्र दिलेले नाही. त्यांनी सरकारकडे  तसे पत्र लिहिले असेल तर मला त्याची माहिती नाही.  त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सभागृहात आलेलो नाही, अशी माहिती देत असतील तर ते चुकीची माहिती देत आहेत. 

चौदा महिने सत्तेत राहिल्यानंतर आमचे सरकार आता निर्णायक स्थितीवर पोहोचले आहे. चला चर्चा करू. तुम्ही तरीही सरकार बनवू शकता. घाई कशाला? सोमवारी किंवा मंगळवारी सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करून पुढे जाणार नाही, असे कुमारस्वामींनी सांगत एक प्रकारे बहुमत चाचणी घेण्याआधीच भाजपला सत्तास्थापनेसाठी अप्रत्यक्ष निमंत्रण दिले.