Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Belgaon › पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस-भाजप आमनेसामने

पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस-भाजप आमनेसामने

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 10:25PMनिपाणी  : राजेश शेडगे

नगरपालिका निवडणुका होणार.... होणार...म्हणून चर्चेत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. नगरपालिकेची निवडणूक 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याने निपाणी पालिकेवर झेंडा कोणाचा, याची चर्चा रंगली आहे.

10 पासून 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 18  रोजी अर्जांची छाननी व 20  रोजी माघार घेण्याची मुदत आहे. 29 रोजी मतदान होणार आहे. निपाणीत इच्छुकांची धावपळ उडाली आहे. विद्यमान पालिका कौन्सिलची मुदत 12 सप्टेंबरपर्यंत आहे. 

सन 2007  सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी तब्बल 120 उमेदवारांनी नशीब आजमावले होते. 2013 मध्ये 208 अर्ज दाखल झाले होते. त्यावेळी जोल्ले व जोशी गटाने एकत्रित निवडणूक लढविली होती. भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. अपक्षांचा त्यावेळी वरचष्मा राहिला होता.

गत कौन्सिलची विकासकामे

पाच वर्षात भारती घोरपडे, नम्रता कमते, सुजाता कोकरे या पहिल्या अडीच वर्षासाठी तर दुसर्‍या अडीच वर्षासाठी विलास गाडीवड्डर यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कौन्सिलने पाच वर्षांत शहरात नगरोत्थान अंतर्गत रस्ते व गटारी, स्वागत कमानी, पालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांती स्तंभ, यशवंतराव चव्हाण पुतळा उभारणी, दत्त खुले नाट्यगृह, तलावाचे पुनर्निर्माण, हमाल समाजभवन, मराठा समाजभवन, स्मशानभूमी सुधारणा, शववाहिका, बसस्थानक सर्कलमध्ये सिग्नल व्यवस्था, म्युनिसिपल हायस्कूलमध्ये इंग्रजी शाळा, तलावाभोवती संरक्षक भिंत यासारखी अनेक विकासकामे केली आहेत. 

गत कौन्सिलला शहराला दररोज पाणीपुरवठा करणे, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्ण करणे, उद्यानांची सुधारणा व सौंदर्यीकरण,  शहरासह उपनगरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पथदीपांची उभारणी, भुयारी गटार योजना, स्वच्छ व सुंदर निपाणी यासारख्या गोष्टी शहरवासियांना देण्यात अपयश आले आहे. 

अनेक आघाड्यांच्याही उड्या

जोशी-जोल्ले गटात फारकत झाल्यावर ही निवडणूक होत आहे. काही दिवसापासून पालिकेतील सत्तारूढ गटाने मोर्चेबांधणी चालविली आहे. माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ. प्रा. सुभाष जोशी व  विलास गाडीवड्डर ही मंडळी एका बाजूला तर विरोधी भाजप आणि आ. शशिकला जोल्ले, सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले दुसर्‍या बाजूला अशी आमने-सामने लढत होणार आहे. अनेक आघाड्यांनीही उड्या मारल्या आहेत.

गत निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांपैकी 21 जणांनी नशीब आजमावले होते. यापैकी  फक्त 9 जणांना विजय मिळाला होता. आता या निवडणुकीत विद्यमानांपैकी कुणाकुणाला पुन्हा संधी मिळते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. भाजप व काँगे्रसकडेही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने दोन्ही पक्षनेत्यांना उमेदवारी देताना  तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  आ. जोल्ले यांना पालिकेचा गड ताब्यात घेण्यासाठी मोठी लढत द्यावी  लागणार आहे.