Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Belgaon › कर्नाटकात ऑपरेशन कमळ; काँग्रेसच्या ८ आमदारांचे बंड?

कर्नाटकात ऑपरेशन कमळ; काँग्रेसच्या ८ आमदारांचे बंड?

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 8:21AMबंगळूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील राजकारणाचे परिणाम काँग्रेस-निजद आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची चिन्हे आहेत. पालिका प्रशासनमंत्री रमेश जारकिहोळी सोमवारी  अचानक बंगळुरात दाखल झाले. दरम्यान, काँग्रेसचे 8 आमदारबंडाच्या तयारीत असून रमेश जारकीहोळी यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाल्याचे समजते.

याआधीपासूनच जारकिहोळी यांचे समर्थक आठ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जारकिहोळी आणि भाजप नेत्यांमध्ये याआधी काही फेर्‍यांमध्ये चर्चा झाली आहे. सुमारे 16 आमदारांना ‘ऑपरेशन कमळ’द्वारे भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रमेश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या समर्थकांना योग्य पदाचे आश्‍वासन भाजपने दिल्याचे समजते.

नेत्यांवर नजर
आमदार लक्ष्मी हेब्बाळकरही बंगळुरात आल्या असून त्यांनी प्रदेश काँग्रेसमधील वरिष्ठांशी चर्चा चालविली आहे. या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी विदेश दौरा रद्द केला असून सर्व नेत्यांवर नजर ठेवली आहे.

पीएलडीचा वाद

बेळगावातील पीएलडी बँकेच्या चेअरमनपद निवडणुकीवरून हेब्बाळकर आणि जारकीहोळी बंधूंमध्ये वाद सुरू झाला. कर्नाटक प्रदेश काँग्रेसने यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर हेब्बाळकरांच्या गटातील उमेदवाराला अध्यक्षपद मिळाले. दोघांच्या मध्यस्थीवेळी जारकीहोळींनी काही अटी काँग्रेस वरिष्ठांसमोर ठेवल्याचे समजते. पण, त्या पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सोमवारी मंत्री जारकीहोळी बंगळुरात दाखल झाले. ते भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे प्रसार माध्यमांना समजल्याने ठिकाण बदलण्यात आले. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा नैसर्गिक उपचार केंद्राकडे जाणार असल्याचे सांगून अज्ञात स्थळी गेले. यावरून तर्कवितर्क करण्यात येत आहेत. गोवा आणि महाराष्ट्रातील नेत्यांमार्फत कर्नाटकातील भाजपशी त्यांनी संपर्क साधल्याची माहिती मिळाली. दरम्यान, दिल्‍ली दौर्‍यावर असणारे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. 

पाटबंधारेमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आ. हेब्बाळकर यांना पुढे करून जारकीहोळींविरोधात लढा पुकारला आहे. जारकीहोळींचे वर्चस्व कमी करण्यासाठी ही खेळी केल्याचे राजकीयतज्ज्ञांना वाटते. त्यांच्या विरोधात आता जारकीहोळी बंधूंनी शड्डू ठोकला आहे.

भाजप प्रवेशाचे वृत्त खोटे आहे. बेळगावातील पीएलडी बँक निवडणुकीत अपमान झाला असता तर त्याचवेळी राजीनामा दिला असता. माझे बंधू सतीश जारकिहोळी यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यांचा अपमान झाला तर सहन करणार नाही.
- रमेश जारकिहोळी, पालिका प्रशासनमंत्री

येडियुराप्पांचे रहस्य उलगडले
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्‍ली येथे भाजप कार्यकारिणी बैठक सुरू असताना प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा तातडीने बंगळुरात दाखल झाले होते. यामागील रहस्य आता उघडकीस आले आहे. जारकिहोळी यांच्यासह काही आमदार भेट घेणार असल्यानेच येडियुराप्पा परतले होते.