Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Belgaon › भाजपात असंतोषाचा भडका

भाजपात असंतोषाचा भडका

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 20 2018 12:58AMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस आणि भाजपमध्ये गेले काही दिवस इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने राज्यभरात असंतोष धुमसत आहेच, पण गुरुवारी बेळगावात उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला आणि संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार तसेच आणखी नेत्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. लोकमान्य टिळक चौक आणि गोवावेस चौकात गुरुवारी सायंकाळी हे आंदोलन झाले.

शहरातील उत्तर व दक्षिण मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही काही इच्छुक नेते आपल्याला उमेदवारी जाहीर झाली, असा प्रचार समाज माध्यमांवर करत आहेत. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचे? जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतेही संभ्रम दूर करत नाहीत. खा.सुरेश अंगडी यांनीही गोंधळ दूर करण्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्‍त केला.

बेळगाव दक्षिण मतदारसंघातून माजी आ. अभय पाटील, विणकर नेते पांडुरंग धोत्रे तसेच सुनील चौगुले इच्छुक आहेत. तर उत्तरमधून अ‍ॅड. अनिल बेनके, किरण जाधव व डॉ. रवी पाटील इच्छुक आहेत. पैकी अभय पाटील आणि अ‍ॅड. बेनके यांना उमेदवारीसह पक्षाचा बी-फॉर्मही मिळाला असल्याचा प्रचार समाजमाध्यमांवर गुरुवारीदिवसभर सुरू होता. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांत उत्साह पसरला तर काही कार्यकर्ते संतप्त बनले.

उमेदवारीबाबत अनेक वर्षापासून पक्षासाठी कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. भाजपचे सेक्रेटरी असणारे खा.सुरेश अंगडी यांनी कार्यकर्त्यांतील संभ्रमावस्था दूर करणे आवश्यक आहे. मात्र या प्रकाराची त्यांच्याकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप करत त्यांच्या प्रतिमांचे दोन्ही मतदारसंघांमध्ये दहन करण्यात आले.

पक्षाने अधिकृतपणे घोषणा केली नसताना नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अधिकृत नाव जाहीर करण्यात यावे आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यात यावी, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी टिळक चौकात तसेच गोवावेस चौकात खा.सुरेश अंगडी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तिकीट कोणाला ही मिळो, मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यातून करण्यात येत आहे.