Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Belgaon › गणेशोत्सवापूर्वी शहरातील कामे पूर्ण करा

गणेशोत्सवापूर्वी शहरातील कामे पूर्ण करा

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:37AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेजवाहिनी, खोदाई, आरोग्य, अवजड वाहतूक आदी विषयांवरून मनपा अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधींनी धारेवर धरले. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना समस्या येत आहेत. यासाठी गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व कामे पूर्ण करा असा आदेश देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे अधिकार्‍यांनीही मान डुलवली. मात्र, गणेशोत्सवापूर्वी प्रत्यक्षात किती कामे पूर्ण होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

महानगरपालिका सभागृहात शनिवारी (दि.28) प्रशासकीय बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर बसप्पा चिक्कलदिनी होते. व्यासपीठावर उपमहापौर मधुश्री पुजारी, आयुक्त शशिधर कुरेर, शहर रचना समतीचे अध्यक्ष मोहन भांदूर्गे, कर समितीचे अध्यक्ष पुंडलिक परिट, आरोग्य आणि स्थायी समिती अध्यक्षा सुधा भातकांडे, लेखा समिती अध्यक्षा वैशाली हुलजी, दीपक जमखंडी, गटनेते संजय शिंदे होते. 

बैठकीला आरोग्य, हेस्कॉम, वनखाते, सार्वजनिक बांधकाम खाते, छावणी परिषद आदी विभागाचे अभियंते व अधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्ते, ड्रेनेज, हेस्कॉम या विषयावर चर्चा 
रंगली. 

दक्षिण विभागातील रस्त्यांविषयी माहिती देताना अभियंते आर. एस. नाईक यांनी कॉलेज रोड, रुक्मिणीनगरसह व इतर भागातील रोड खराब झाले आहेत. काही रोडवर पॅचवर्क करण्यात येत आहे. हेस्कॉमने खोदाई केल्यामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत, असे सांगितले. शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी महाद्वार रोड, काँग्रेस रोड, आरपीडी रोड, महात्मा फुले रोड, गुडशेड रोड खराब झाला असून काही ठिकाणी पॅचवर्कचे काम सुरु असल्याचे सांगितले. काँग्रेस रोडचे स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरु आहे. तिथे पॅचवर्क व पेव्हरचे काम केले आहे. याठिकाणी सतत गर्दी असल्याने काम करताना अडचणी येत आहेत. 

छावणी परिषदेचे सतीश मन्नुरकर यांनी, छावणी परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या काही रस्त्यावर पॅचवर्क सुरु आहे. गॅस पाईपलाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे समस्या येत आहे, असे सांगितले. 
जुना धारवाड रोड सीडीवर्कचे काम गेल्या अनेक दिवसांपासून राहिले आहे. याबाबत सातत्याने सूचना करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार नगरसेवक दीपक जमखंडी यांनी करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. 

महापौर चिक्कलदिनी म्हणाले, पावसामुळे शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते, छावणी परिषद, मनपाच्या अख्त्यारित येणारे अनेक रस्ते आहेत. यामुळे सर्वच रस्त्यांवर फलक लावण्यात यावे. खड्डे बुजविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून विशेष अनुदान घ्यावे.

उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी, रस्ते, नाला, गटारींच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या. मुख्य अभियंते आर. एस. नाईक यांना याबाबत कारवाई करण्याबरोबरच त्याची माहिती आपणाला देण्यात यावी, अशी सूचना केली. आतापासूनच आगामी पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी असे सांगितले. त्याबाबत नाईक यांनी खबरदारी घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

आयुक्त कुरेर यांनी, अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सध्या काँग्रेस रोडवर पॅचवर्कचे काम त्वरित करा. दिवसा अडचण येत असेल तर रात्रीच्या वेळी या रस्त्याचे काम करा, असे आदेश दिले.