Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Belgaon › कार बर्नरविरुद्ध तक्रारी वर्षभरापासूनच

कार बर्नरविरुद्ध तक्रारी वर्षभरापासूनच

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

स्पर्धेच्या युगात प्रत्येकाची मानसिकता झपाट्याने बदलत आहे. हवी असलेली गोष्ट लगेच प्राप्त करण्यासाठी काहीही करण्याची तयारी आजच्या पिढीची आहे. मात्र महत्वाकांक्षा असणे वेगळे आणि अतिमहत्वाकांक्षा असणे वेगळे. अतिमहत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन गुन्हेही होतात.

मात्र, बीम्स या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात  प्राध्यापक असणार्‍या डॉक्टरने 19 कार जाळल्याचे उघडकीस आल्यानंतर सारेच चक्रावून गेले आहेत. एका डॉक्टरने असा प्रकार का करावा, हा प्रश्न आहे. ते शोधून काढण्याचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे. त्याचबरोबर डॉ. अमित गायकवाड वर्षभरापासूनच विचित्र वागत होता, तशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या, अशी माहिती एपीएमसी पोलिस निरीक्षक जे. एम. कालेमिर्ची यांनी ‘पुढारी’ला दिली.

कालेमिर्ची म्हणाले, डॉ. अमित गायकवाड हा महाविद्यालयात आल्यापासूनच अनेकांशी वाद उकरत होता. त्याचे कोणाशीही पटत नव्हते. गेल्या वर्षभरात त्याने अनेकांशी वाद घातला होता. त्याच्याविरोधात महाविद्यालयातील सहकार्‍यांंनी अनेकवेळा पोलिस ठाण्यात तक्रारही दिल्या होत्या.  गेल्या महिन्याभरातही शिवीगाळीच्या तक्रारी त्याच्या सहकार्‍यांनी त्याच्याविरोधात दिल्या होत्या. गेल्या चार दिवसात शहरातील विविध भागात 9 कार जाळण्यात आल्या. हे कृत्य समाजकंटकांकडून केले जात असावे, असाच  संशय होता. 

दहा वर्षांपासून सेवेत

एमबीबीएसचे शिक्षण घेतलेला डॉ. अमित  दहा वर्षापासून बेळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत काम करीत आहे. गेल्या दहा वर्षात डॉ. अमितच्या वागणुकीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सुरवातीला त्याच्या वर्तणुकीबाबत कोणाचीही तक्रार नव्हती. आपल्या विभागातील प्रत्येक काम सचोटीने करीत होता. बैठकांमधून आपल्या अखत्यारितील  कामांची माहिती तो परिपूर्णपणे सादर करत होता. डॉ. अमित जबाबदारीने काम करीत असल्यामुळे त्याच्यावर बीम्समधील नव्या रक्तपेढीची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली होती, अशी माहिती बीम्सचे संचालक कळसद यांनी दिली होती. 

त्याचवेळी एपीएमसी पोलिस निरीक्षक कालेमिर्ची यांनी डॉ. अमित पूर्वीपासूनच सर्वांशी फटकळ वागायचा, अशी माहिती दिली. अमितच्या वागणुकीसंदर्भात कळसद आणि कालेमिर्ची यांनी परस्परविरोधी विधाने केल्यामुळे  डॉ. अमितचा नेमका स्वभाक काय, हा प्रश्न आहे. 

कृत्य नियोजनबद्ध

शहरातील काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधला असता त्यांनीही डॉ. अमितने केलेल्या कृत्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.  मानसिक संतुलन ढळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये अनुवंशिकता, मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडणे, आयुष्यात येणार्‍या बर्‍या-वाईट क्षणांचा सामना आपल्या मानसिक कुवतीप्रमाणे करणे, बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, बदलांना सामोरे जाण्याची क्षमता, चिंताग्रस्तता, नैराश्य, इर्षा, द्वेष, मत्सराचा अतिरेक यातूनही माणसाचे संतुलन ढासळू शकते, असे मत जाणकार व्यक्त करतात.

मात्र डॉ. अमितला नक्की काय झाले असावे? हा फक्त चर्चेचा विषय आहे. एकमात्र नक्की की त्याचे कार जाळण्याचे कृत्य नियोजनबद्ध होते. घरी डिझेल आणि स्पिरीट साठवणे, कापूर हा तीव्र ज्वालाग्रही पदार्थ सोबत ठेवणे, दोर्‍याचे बंडल आणि कापडी बोळे सोबत ठेवणे, ओळख सापडू नये यासाठी कारला आग लावताना हेल्मेट घालणे अशी सारी तयारी डॉ. अमित करत होता. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असे नियोजनबद्ध कृत्य करू शकते का हा प्रश्न आहे.