Thu, Jul 18, 2019 10:23होमपेज › Belgaon › खर्च सैराट; मूलभूत प्रश्‍नांकडे पाठ

खर्च सैराट; मूलभूत प्रश्‍नांकडे पाठ

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 10:21PMखानापूर : वासुदेव चौगुले

ग्रामीण तरुण संघटनांच्या नादाला लागून ऐन उमेदीच्या काळात बेरोजगार राहत आहेत. त्यातच आता निवडणूक जवळ आल्याने गावोगावचे नेते मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून लोकप्रिय कार्यक्रम भरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  यामुळे खानापूरच्या नेत्यांची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा कार्यक्रमांबरोबरच नेत्यांनी विधायक उपक्रम राबवावेत, अशी मागणीही होत आहे. 

नववर्षाच्या सुरुवातीपासून तालुक्यात सर्वत्र कबड्डी, क्रिकेट स्पर्धांना जोर येतो. हजार, दोन हजारांत होणार्‍या स्पर्धांचे आजचे बजेट दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. अशा स्पर्धा भरवण्यासाठी राजकारण्यांना आग्रह केला जातो. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी  नेत्यांनाही देणगीची पावती फाडावी लागते.

खानापूर तालुक्यात दहा वर्षापूर्वी बक्षीस आणि देणग्यांची पद्धत प्रचलित नव्हती. शहरी भागाचे वारे वाहू लागल्याने हजार-बाराशे लोकसंख्येच्या गावातही लाखो रुपये खर्चून स्पर्धा होतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून त्याचा आनंद दोन दिवसाच्या मनोरंजनापुरता राहतो. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक नेत्यांना जागे करुन बक्कळ निधी संकलित केला जात आहे. तथापि स्पर्धेनंतर जमा-खर्च तपशील देण्याचे सौजन्यही आयोजक दाखवत नाहीत.

बेरोजगारी

खानापूर तालुक्यात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी अपेक्षित प्रयत्न दिसत नाहीत. तालुक्यात मोठा कारखाना उभारल्यास  अनेक युवकांना काम मिळेल. युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देता येऊ शकते. 

वर्षाकाठी होतोय दोन कोटींचा चुराडा

तालुक्यात 230 हून अधिक गावांचा समावेश आहे. आमदारकीसाठी इच्छुक नेत्यांना मनात नसतानाही सर्व ठिकाणी हजेरी लावून देणगी द्यावी लागते. मंदिरांची उभारणी, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आदींसाठी वर्षाकाठी खानापूर तालुक्यात दोन कोटी रुपये खर्च होत असल्याचा अंदाज निरीक्षणातून व्यक्‍त  करण्यात आला आहे.

काय करता येईल?

नेत्यांनी अवास्तव खर्च टाळून विधायक कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाणीटंचाई तोंडावर आहे. त्यावर काम करणे अपेक्षित आहे. शाळेची डागडुजी, गरीब विद्यार्थ्यांना मदत, विद्यार्थ्यांना करिअरसंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, शैक्षणिक प्रगतीवर भर, वाचनालयांची उभारणी यासारख्या उपक्रमाना महत्त्व द्यावे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.