Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Belgaon › दळणवळण समृद्धीने भारत शक्‍तिशाली

दळणवळण समृद्धीने भारत शक्‍तिशाली

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:39AMबेळगाव : प्रतिनिधी

देशात दळणवळण यंत्रणा समृद्ध झाली तर भारत शक्‍तिशाली होईल. आमचे सरकार येण्यापूर्वी देशात सहा हजार कि. मी. चा राष्ट्रीय महामार्ग होता. पण, आम्ही या मार्गांचा विस्तार करून 13 हजार कि.मी.पर्यंत वाढविला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

ते येथील सुवर्णसौधमधील सेंटर हॉलमध्ये आयोजित बेळगाव-खानापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करून बोलत होेते. कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन झाले. खा. सुरेश अंगडी, राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, आ. संजय पाटील, आ. महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री उमेश कत्ती, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला व्यासपीठावर होते. 

ना. गडकरी पुढे म्हणाले, देशात भाजपनेच विकासाचे पर्व आणले आहे.  म्हणून देश प्रगतिपथावर आहे. दोन दोन पिढ्या जातील एवढ्या चांगल्या दर्जाचे रस्ते आम्ही करत आहोत. देशाच्या समृद्धीसाठीच एकूण 12 नवे एक्स्प्रेस हायवे बनविणार आहोत. नेपाळ आणि चीन देशाला जोडणार्‍या नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पाणी शुद्धीकरणासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. 

यावेळी खा. अंगडी यांनी ना. गडकरी यांच्याकडे सौंदत्ती, यरगट्टी, बागलकोट हा राज्य महामार्ग हैदराबादपर्यंत वाढवून याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करा तर गोटूर ते अथणी हा राज्यमार्ग विजापूरपर्यंत वाढवावा, अशी मागणी केली.