होमपेज › Belgaon › ‘पीओपी’ बैठकीला आयुक्‍तांची दांडी

‘पीओपी’ बैठकीला आयुक्‍तांची दांडी

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 12:57AMबेळगाव : प्रतिनिधी

‘पीओपी’ गणेशमूर्तींबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. शनिवारी मनपा आयुक्‍तांनी मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावूनही ते स्वतःच बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे मूर्तिकारांची अस्वस्थता वाढली आहे.

अवघ्या 20 दिवसांवर गणेशोत्सव आला असताना जिल्हाधिकार्‍यांनी ‘पीओपी’ गणेशमूर्ती जप्त करण्याचा आदेश दिला. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आयुक्‍त शशीधर कुरेर यांनी शनिवारी मूर्तिकारांची बैठक बोलाविली होती. मात्र, आयुक्‍त जिल्हाधिकार्‍यांनी  बोलाविलेल्या स्मार्ट सिटी बैठकीला हजर राहिल्याने मूर्तिकारांबरोबरील चर्चेला ते हजर राहू शकले नाहीत. शिवाय, तशी पूर्वकल्पनाही मूर्तिकारांना देण्यात आली नाही. परिणामी मूर्तिकार दीड तास ताटकळत बसले होते. 

दीड तासानंतर आरोग्याधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा यांच्याशी मूर्तिकारांनी चर्चा केली. मूर्तिकार म्हणाले, अचनाकपणे ‘पीओपी’वर बंदी आणली आहे. शहरात कृत्रिम तलाव आहे, त्यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्‍नच येत नाही. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने बंदी मागे घेऊन सहकार्य करावे. 
 
आरोग्याधिकारी नाडगौडा म्हणाले,  मूर्तीकार व आयुक्तांची लवकरच बैठक बोलवून तोडगा काढण्यात येईल. पण तुम्ही पर्यावरणस्नेही मूर्ती तयार करा.  त्यावर मूर्तीकार म्हणाले, पुन्हा बैैठक बोलविली, तर आमचा वेळ जाणार आहे. उत्सव जवळ आल्याने मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. यासाठी लवकर निर्णय घेऊन सहकार्य करा. नितीन जाधव, विशाल गोदे, संजय किल्लेकर, विजय जाधव, रवी कलघटगी, हेमंत हावळे, संजय मस्के, मनोहर पाटील, रवी लोहार, शंकर कुंभार आदी मूर्तीकार उपस्थित होते.