Tue, Apr 23, 2019 18:16होमपेज › Belgaon › चला, उठा... जिंकायची आहे लोकसभा!

चला, उठा... जिंकायची आहे लोकसभा!

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 8:31PM
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात सत्तेवर न आल्याची खंत न बाळगता आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठी चला, उठा... तयारीला लागा असे आवाहन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले आहे. राज्यव्यापी दौर्‍याचा एक भाग म्हणून नुकताच त्यांनी सुमारे दोन हजार कि.मी.चा दौरा पूर्ण केला. या दौर्‍यात त्यांनी मरगळलेल्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना जिंकण्याचा मंत्र दिला.

19 मे रोजी सत्तास्थापनेपूर्वीच मुख्यमंत्री बनलेले येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यभर दौरा हाती घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी दौर्‍याचा प्रारंभ केला आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, चिखल व अन्य समस्या असूनही त्यावर मात करुन येडियुराप्पा यांनी आपली प्रचार यात्रा सुरुच ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी ते यल्‍लापूर भागात आले होते. राज्यातील या महिन्यात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान भाजप समोर आहे. 105 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी किमान 60 टक्के जागा जिंकण्याचा चंग येडियुराप्पा व त्यांच्या टीमने बांधला आहे. या दौर्‍यात कार्यकर्ते आणि स्थानिक पक्ष पदाधिकार्‍यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे ते म्हणाले.

कारवार जिल्ह्यातील यल्‍लापूरची निवड त्यांनी केली होती. कारण विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यल्‍लापूरमध्ये त्यांनी शक्‍ती केंद्राचे नेते आणि जिल्हा कार्यकारिणीला त्यांनी संबोधित केले. सत्ता स्थापन न झाल्यामुळे निराश न होता नव्या जोमाने कामाला लागा आणि विजयश्री खेचून आणा असा मंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.गेल्या सहा दिवसात त्यांनी दोन हजार कि.मी.चा प्रवास करुन प्रचार सभा केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 47 हजाराहून अधिक कि.मी.चा प्रवास पार केला आहे. अशी माहिती पक्षाचे नेत्या शोभा करंदलाजे यांनी दिली. 

भाजपच्या तुलनेत राज्यातील युती सरकारात सहभागी असलेले काँग्रेस आणि निजद यांच्या प्रचाराचा अद्याप पत्ताच नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी त्यांनी अद्याप आपले बिगूल वाजविलेले नाही. तर लोकसभा निवडणुकीसाठीचे सोडूनच द्या. या पार्श्‍वभूमीवर भाजपाने एव्हाना राज्यातील निम्मे जिल्हे पादाक्रांत केले आहेत.एकांड्या शिलेदाराप्रमाणे लोकसभा जागा जिंकण्यासाठी येडियुराप्पा शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा केंद्रात सत्ता मिळवून देण्याची धडपड त्यांनी चालविली आहे.

कुठे कुठे दौरा...

या नेत्यांनी बिदर, गुलबर्गा, यादगिर, रायचूर, बळ्ळारी, कोप्पळ, हुबळी, गदग, हावेरी आणि कारवार जिल्हा या भागात प्रचार दौरा केला आहे. 75 वर्षीय येडियुराप्पा अथक दौरा करीत आहेत.