Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Belgaon › दहशतवादविरोधात संयुक्त युद्धाभ्यास महत्त्वाचा 

दहशतवादविरोधात संयुक्त युद्धाभ्यास महत्त्वाचा 

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:02PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण जगाला दहशतवादाचा धोका आहे. अशावेळी दहशतवादविरोधात लढण्यासाठी दोन देशांमध्ये संयुक्त लष्करी युद्धाभ्यासाची गरज असल्याचे मत मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी व्यक्त केले. भारत-मालदिव दरम्यान संयुक्त  लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात आले आहे. या कवायतींच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 

मराठा रेजिमेंटच्या छ. शिवाजी स्टेडियमवर शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी कलवाड यांच्यासह लष्कराचे कॅप्टन महंमद शिनान उपस्थित होते. यावेळी ब्रिगेडियर कलवाड यांना दोन्ही देशांच्या लष्करी जवानांनी मानवंदना दिली. 

ब्रिगेडियर कलवाड म्हणाले, दोन आठवड्यांच्या युद्धाभ्यास शिबिरात दोन्ही देशांच्या जवानांना दहशतवाद आणि राष्ट्रद्रोह्यांविरोधात लढण्याचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. संयुक्त शिबिरामुळे दोन्ही देशांच्या जवानांना भावी काळात दहशतवादी आणि राष्ट्रद्रोह्यांविरोधात यशस्वीपणे लढण्याचा आत्मविश्‍वास प्राप्त होणार आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दृढ होणार आहेत. पुढील काळातही या ठिकाणी अशाप्रकारच्या संयुक्त लष्करी युद्धाभ्यासाच्या कवायती होत राहतील. जवानांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा आणि लष्करी प्रशिक्षण देण्याकडे लक्ष देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
मालदिव लष्कराचे कॅप्टन महंमद शिनान म्हणाले, यापूर्वी भारतात आठ संयुक्त लष्करी कवायती झाल्या आहेत. बेळगावात तिसर्‍यांदा संयुक्त लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त युद्धाभ्यासातून जवानांमध्ये सुधारणा घडते. चांगल्या गोष्टी शिकता येतात.   

कर्नल व्ही. वशिष्ट म्हणाले की, दोन्ही देशांचे एकूण 90 सैनिक संयुक्तपणे युद्धाभ्यास करणार आहेत. अशा संयुक्त लष्करी युद्धाभ्यासातून जवानांना चांगल्या लष्करी प्रशिक्षणाबरोबर स्वत:मधील कर्तबगारीची ओळख करून घेता येईल. यावेळी दोन्ही देशांचे ध्वज घेऊन संयुक्त युद्धाभ्यास करणार्‍या जवानांनी पथसंचलन केले. उद्घाटन कार्यक्रमानिमित्त चित्ताकर्षक कार्यक्रमही झाले.

14 दिवस दोन्ही देशांचे जवान युद्धाभ्यास करणार

यापूर्वी बेळगावात  ऑक्टोबर 2009, नोव्हेंबर 2012 साली भारत-मालदिव लष्करी युद्धाभ्यास कवायती  झाल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सूचनेनुसार दहशतवादाविरोधा लढण्यासाठी दोन देशांत समन्वय हवा. या हेतूने तिसर्‍यांदा भारत-मालदिव देशांदरम्यान संयुक्त लष्करी युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 दिवस दोन्ही देशांचे जवान संयुक्तपणे युद्धाभ्यास करणार आहेत.