बेळगाव : परशराम पालकर
सरकारी शाळेकडे मुलांबरोबर पालकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शिक्षकवर्ग लढवत आहेत. म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुडू तालुक्यातील हारोपूर गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेला चक्क आगगाडीप्रमाणे रंगरंगोटी करून शाळेचे रूप पालटले आहे. या परिसरात सरकारी माध्यमाच्या पाच शाळा असून विद्यार्थी मिळविण्यासाठी येथील शिक्षकांनी शाळेचे बाह्यरूप पालटण्यावर भर दिला आहे. याचा आदर्श राज्यातील इतर शाळांनी घेण्यासारखा आहे.
म्हैसूर शैक्षणिक जिल्ह्यांतर्गत हरोपूरा गाव येते. येथील सरकारी शाळेकडे मुलांना व पालकांना आकर्षित करण्यासाठी कन्नड माध्यमाच्या उच्च प्राथमिक शाळेला आगगाडीप्रमाणे रंगरंगोटी केली आहे. गावची लोकसंख्या 1230 आहे. गावात 230 घरे आहेत. महिलांची लोकसंख्या 50 टक्के असून साक्षरतेचे प्रमाण 58 टक्के आहे. महिलांचे प्रमाण 22.8 टक्के आहे. पुरुषांची लोकसंख्या 613 असून महिला 617 आहे. आगगाडीसारख्या रंगरंगाटी केलेल्या शाळेत 120 मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या कार्यालयाला आगगाडीच्या इंजीनप्रमाणे रंगरंगोटी केली आहे. इतर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग दक्षिण मध्य रेल्वेप्रमाणे रंगविले आहेत. राज्यात ही शाळा ‘ट्रेनस्कूल’ नावाने प्रसिध्दीच्या झोतात येत आहे. सोशल मीडियावर या शाळेची जोरदार चर्चा आहे. या गावापासून सुमारे 10 कि. मी.वर रेल्वेस्थानक आहे. तेथे रेल्वे पाहण्यासाठी मुले दर रविवारी जात होती.