Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Belgaon › आचारसंहिता ‘आरटीओ’च्या पथ्यावर 

आचारसंहिता ‘आरटीओ’च्या पथ्यावर 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 11:11PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहिता आरटीओ खात्याच्या पथ्यावर पडली आहे. जिल्ह्यात आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या वाहनतपासणी मोहिमेंतर्गत 5 हजार 550 प्रकरणात लाखो रुपयांचा कर जमा झाला आहे. त्याचबरोबर राज्यातही सदर मोहीम गतिमान करण्यात आली असून केवळ 20 दिवसाच्या कालावधीत नियमाचे उल्लंघन करून आणि विना कर धावणार्‍या वाहनावर कारवाई करण्यात आली. या माध्यमातून 7.44 कोटी रु. कर जमा झाला आहे. यामुळे आरटीओ खात्याला आर्थिक दिलासा मिळाला आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

वाहनधारकाकडे वाहनासंदर्भातील कागदपत्रांबरोबर कर भरल्याच्या कागदांची तपासणी करण्यात येत आहे. कागदपत्रे नसलेल्यांना दंड आकारण्याबरोबर कर भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. याचा फायदा परिवहन मंडळाला होत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार घेण्यात आलेली वाहन तपासणी मोहिमेमुळे परिवहन खात्याला दिलासा मिळाला आहे. मागील 20 दिवसांत 5 हजार 550 प्रकरणे आढळली असून यामधून कर 88 लाख 33 हजार 544 रु. जमा झाले आहेत. तर 97 लाख 22 हजार 769 दंड जमा झाला आहे.त्याचबरोबर राज्यातील बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, म्हैसूर, शिमोगा, गुलबर्गा आदी भागातही परिवहन खात्याच्या उत्पादनात भर पडली आहे. प्रत्येक शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य सीमेवर तपासणी करण्यात येत आहे. यामुळे विनापरवाना वाहनधारक अडचणीत सापडले आहेत. 

राज्य परिवहन महामंडळालाही फायदा

आचारसंहिता लागू असल्यामुळे ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून विनापरवाना वाहने मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यामुळे वैयक्तिक वाहने वापरण्याऐवजी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला प्राधान्य देण्यात येत आहे. परिणामी त्यांच्याही उत्पन्नात भर पडली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे वर्‍हाडाच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसनाच पसंती देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

Tags : Belgaum, Code, ethics, path,  RTO