Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Belgaon › आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अधिकारी व कर्मचार्‍यांची छोट्या चुकीमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांनी चिकोडी-सदलगा व निपाणी मतदारसंघात  आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोर करावी, अशी सूचना गीता कौलगी यांनी केली.

येथील मिनी विधानसौध येथील सभागृहात आचारसंहितेची अंमलबजावणी व  निवडणूक तयारीविषयी चिकोडी, निपाणी मतदारसंघातील सर्व सेक्टर अधिकारी, फ्लाईंग स्कॉड व अबकारी, पोलिस, महसूलसह विविध खात्यांच्या अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौलगी बोलत होत्या. 

त्या पुढे म्हणाल्या, आचारसंहिता व  नियमांची माहिती असलेली पुस्तिका देण्यात आली असून त्याचे वाचन करावे. निवडणूक काळात रोज सूचना देण्यात येणार असून त्याचे पालन करावे. प्रत्येक पोलिस स्थानकांच्या व्याप्तीनुसार  फ्लाईंग स्कॉडची रचना करण्यात आली आहे. फ्लाईंग स्कॉडसोबत पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश असून त्यांच्याशी बोलून  काम करावे. व्याप्तीत फिरुन रॅली, जेवणावळ्या, साहित्य व पैशांचे वाटप होत आहे का, यावर लक्ष ठेवावे. यावेळी याचे चित्रीकरण करुन टीमकडे द्यावे. तसेच किती साहित्य वापरण्यात आले, खर्च किती झाल्याचा अहवाल तयार करावा. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी तेथे उपस्थित राहून शामियानाचा आकार, दुचाकींची संख्या, क्रमांक यासह सर्व माहिती संग्रहित करावी. कार्यक्रम झाल्यानंतर काही साहित्य वाटप करण्यात  येते का, याचे चित्रीकरण करावे.  

चिकोडी सदलगा मतदारसंघात 244 मतदान केंद्रे असून यात 23 संवदेनशील केंद्रे आहेत. निवडणुकीच्या कामासाठी 20 सेक्टर अधिकार्‍यांची तर आचारसहिंतेची अंमलबजावणी व कारवाईसाठी फ्लाईंग स्कॉडच्या 4 टीमची रचना करण्यात आली आहे. तसेच स्टॅटिक सर्व्हीलन्स पथकाच्या 4 टीम, व्हिडीओ व्हिविंग पथकाच्या 2 टीम, खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी एनसीसी टीम 1 तैनात करण्यात आली आहे. सर्व कर्मचार्‍यांना निवडणुकीविषयी दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आलेे.

चिकोडी, निपाणी तालुक्यात 7 चेकपोस्ट 

मद्य, पैशांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी चिकोडी व निपाणी मतदारसंघात एकूण 7 चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. सर्व चेकपोस्ट हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर उभारण्यात आले असून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. येथील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून याठिकाणी पोलिस, अबकारी व महसूल खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदारसंघात  राजकीय नेत्यांना  रॅली, सभांसाठी परवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी चिकोडी मिनी विधानसौध कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी राजू मोगवीर म्हणाले, सर्व बॅनर्स व भित्तीपत्रक काढण्याची जबाबदारी ग्रामीण भागात स्थानिक पीडीओ व सेक्रेटरी तर नगरपालिका व्याप्तीत मुख्याधिकार्‍यांवर असणार आहे. 


  •