Tue, May 21, 2019 18:41होमपेज › Belgaon › किनारपट्टीला अतिवृष्टीचा तडाखा

किनारपट्टीला अतिवृष्टीचा तडाखा

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:19AMबंगळूरः प्रतिनिधी 

मान्सूनच्या जोडीलाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार वारे वाहत असून बुधवारीही किनारपट्टीला वादळाचा व अतिवृष्टीचा तडाखा बसला. मंगळूर, उडपी, कारवार या तीन जिल्ह्यातील जनजीवन त्यामुळे विस्कळीत झाले असून आतापर्यंत 6 जणांचा बळी गेला आहे. मंगळूरमध्ये मंगळवारी एकाच दिवसात 434 मि.मि. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन दिलेल्या माहितीनुसार समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस वाढला आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सार्वजनिक व खासगी इमारती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किती नुकसान झाले आहे हे पाऊस थांबल्यानंतरच करण्यात येणार्‍या सर्व्हेनंतर स्पष्ट होणार आहे. सखल भागातील घरांचे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झाले आहे.

पुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण पथक, अग्निशमक दल व जिल्हा प्रशासनातर्फे बचावाचे कार्य हाती घेण्यात आले असून धोक्याच्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.

अग्निशामक दल व नागरिकांनी 450 विद्यार्थ्यांचा व 35 स्टाफचा बचाव केला असून अळकी येथील गुजराती इंग्रजी शाळेच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने सर्व विद्यार्थी व स्टाफ दुसर्‍या मजल्यावर थांबले होते.  अतिवृष्टीबरोबरच गदग, कारवार, मंड्या, कोडगू या जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याचे प्रकारही घडले आहेत. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व अतिवृष्टीचा आढावा घेतला असून संकटात सापडलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचा आदेश प्रशासनाला दिलेला आहे. 

नागरिकांच्या बचावासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्‍ती करावी. नियंत्रण कक्ष स्थापना करून खबरदारीची उपाययोजना हाती घेण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने आपद्ग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने वितरित करावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.