होमपेज › Belgaon › अनधिकृत कत्तलखाने दहा दिवसांत बंद करा

अनधिकृत कत्तलखाने दहा दिवसांत बंद करा

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

कणबर्गी औद्योगिक वसाहतीमधील कत्तलखाना प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येत्या दहा दिवसांत जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करावी, असा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिला आहे.

जिल्हा पंचायत कार्यालयात शनिवारी आयोजित विविध खात्यांच्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी शहर पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, जिल्हा पोलिसप्रमुख सुनीलकुमार, निवासी जिल्हाधिकारी डॉ. सुरेश इटनाळ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कणबर्गी येथे आढळलेल्या शीतगृहाच्या प्रकारानंतर प्रशासन सतर्क बनले आहे. याप्रकारचे कोणतेही गैरप्रकार जिल्ह्यात सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीर सुरू असणार्‍या कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिकार्‍यांना सक्त सूचना दिल्या असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

औद्योगिक वसाहतीमधील भूखंड केवळ उद्योगधंद्यासाठी देण्यात येतात. मात्र, ऑटोनगर औद्योगिक वसाहतीमध्ये शीतगृहासाठी मिळविलेला भूखंड कोणत्या कारणासाठी घेतला, याची चौकशी सुरू आहे. यामध्ये दोषी आढळल्यास सदर भूखंड रद्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, केआएडीबी, हेस्कॉम, परिवहन, जि. पं., पोलिस, आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दोन तास चर्चा केली. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेमुळे अनधिकृतपणे कत्तलखाने चालविणार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे. 

मनपातर्फे कत्तलखान्यांना नोटीस

शहरातील कसाई गल्लीत सुरू असणार्‍या कत्तलखान्याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने चालतात. टाकावू मांसाची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जात नसल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दिला असून मनपाने नोटीस बजावली आहे. याठिकाणी ताबडतोड प्राणी हत्या थांबवावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

परवानगीसाठी एक खिडकी योजना

कत्तलखाने व मांस प्रक्रिया केंद्रासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी येत्या काळात एक खिडकी योजना सुरू करण्यात येईल. परवानगीसाठी धावपळ करावी लागते. अधिकार्‍यांत समन्वय नसल्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे परवानगीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची यामध्ये परवानगी महत्त्वाची असते. याबाबत तोडगा काढण्याचा सल्ला अधिकार्‍यांना दिला असून लवकरच एक खिडकी योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

पारदर्शक कारवाई

ऑटोनगर परिसरात आढळलेल्या शीतगृहांबाबत कारवाई करण्यासाठी दोन पथकांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि कायदा यांच्या चौकटीत तपासणी होत असून दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी दिली.