Wed, Jul 17, 2019 10:43होमपेज › Belgaon › हिंडलग्यात सफाई मोहीम सुरू

हिंडलग्यात सफाई मोहीम सुरू

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:14AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

हिंडलग्यामधील रस्त्याच्या शेजारी टाकण्यात येत असलेला कचरा आणि प्लास्टिकच्या बाबतीत दै. ‘पुढारी’ने आवाज उठविल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ग्राम पंचायतीने कचरा उचल मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात विजयनगरपासून हिंडलगा कारागृह तसेच वनखात्याच्या नाक्यापर्यंतचा कचरा हटविण्याची मोहीम राबवली. 

‘कचरामुक्‍त हिंडलगा योजना बासनात’ या मथळ्याखाली ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि.14) बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने कचर्‍यांची उचल केली.

बेळगाव-वेंगुर्ला महामार्गाला लागून या ग्रामपंचायतीची हद्द येते. या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. रस्त्याशेजारी टाकलेल्या कचर्‍यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मागील वर्षी कचरा मुक्त हिंडलग्याची घोषणा झोती. मात्र ती कागदावरच राहिली. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना हाती घेतल्या नव्हत्या. यामुळे रहिवासी, वाहनधारकांना याचा सामना करावा लागात होता. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

परिसरात अनेक सुशिक्षित लोक राहतात. रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्याकडून कचरा टाकण्यात येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. ग्रा.पं. ने जबाबदारी टाळत कचर्‍याची उचल न केल्याने रहिवाशांतून संताप व्यक्‍त करण्यात येत होता. हिंडलगा रस्त्याच्या दुतर्फा कचर्‍याचे ढीग पडलेले दिसून येतात. यामध्ये प्लास्टिक कचरा अधिक असतो. यासंबंधी अनेक वेळा रहिवाशांनी ग्रामपंचायतीला सांगूनही  दुर्लक्ष दिसून येत होते. गुरुवारी  बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत जाग झाली व कचर्‍याची उचल करण्यात आली. उचल वारंवार करावी, अशी मागणी रहिवाशांतून करण्यात येत आहे.