Thu, Jun 27, 2019 12:25होमपेज › Belgaon › ‘सिव्हिल’आवारात खून, अनगोळात शिरविरहित मृतदेह

‘सिव्हिल’आवारात खून, अनगोळात शिरविरहित मृतदेह

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:11PMबेळगाव : प्रतिनिधी

काही वर्षापासून जिल्हा रुग्णालय परिसरात हिंडणार्‍या एका वेडसर महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सिव्हिल आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या इंदिरा कॅन्टीन जागेत शनिवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळला. दरम्यान, अनगोळ-उद्यमबागनजीक चौथ्या रेल्वे गेटजवळ शनिवारी पहाटे शीरविरहीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर प्रकार आत्महत्या, अपघात की घातपात असे कोडे पोलिसांना पडले आहे.    

काही वर्षापासून जिल्हा रुग्णालय परिसरात हिंडणार्‍या वेडसर महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सिव्हिल आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या इंदिरा कॅन्टीन जागेत शनिवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळला. 

साठ ते पासष्ठ वयोगटातील ती महिला जिल्हा रुग्णालय आवारातील मोकळ्या जागेत रात्री झोपत असे. प्रसुतीगृहासमोरील जागेत प्रशस्त इंदिरा कॅन्टीन उभारण्यात येत आहे.त्या जागेत शनिवारी सकाळी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अंगावरील साडी विस्कटलेल्या अवस्थेत दिसुन आली. त्यामुळे अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला, अशी तक्रार मल्लिकार्जुन भंगी याच्याकडून घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पण श्‍वान  जिल्हा रुग्णालयात जाऊन घुटमळले. त्यानंतर पंचनामा करुन तो मृतदेह शवागाराकडे पाठवण्यात आला. 

अनगोळ-उद्यमबाग दरम्यानच्या चौथ्या रेल्वे गेट जवळ शनिवारी पहाटे शीरविरहीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर प्रकार आत्महत्या, अपघात की घातपात असे कोडे पोलिसांना पडले आहे.

शनिवारी सकाळी चौथ्या रेल्वे गेटजवळून निघालेल्या नागरिकांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.रेल्वे रुळाजवळ शीर नसलेला मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला. धडा बरोबरच मृतदेहाचा एक हातही दिसत नसल्याने  घातपाताचा संशय आहे. धक्कादायक घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना कळवण्यात आली.पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे द्दष्य पाहुन पोलिसही गोंधळले. याचवेळी बघ्यांची गर्दी वाढली.

पोलिसांनी पंचनामा करुन तो मृतदेह जिल्हा शवागाराकडे पाठवला. त्यानंतर पोलिसांनी 2 कि.मी.अंतर फिरुन रेल्वे मार्गावर मृतदेहाचे शीर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना शनिवारी सायंकाळपर्यंत शिर सापडले नाही. पोलिसांनी तूर्त आत्महत्येची नोंद केली आहे.