होमपेज › Belgaon › शहरातील एटीएम अजूनही कॅशलेस

शहरातील एटीएम अजूनही कॅशलेस

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:02AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर उपनगरात विस्कळित झालेली एटीएम सेवा अजूनही सुरळीत नाही. महिन्यापूर्वी एटीएममधून पुरेसे पैसे मिळत असताना आताच कसा काय अपुरा चलन पुरवठा होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. परगावाहून बाजारहाटसाठी आलेल्यांना तर जास्त फटका बसत आहे. एटीएम सेवेवर भरवसा ठेवून आलेल्या लोकांना बाजारपेठेतून पैशाअभावी माघारी फिरावे लागत आहे. पासबुकशिवाय केव्हाही कुठेही पैसे मिळण्याची व्यवस्थाच ठप्प झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

गुरुवार 29 मार्चपासून काही दिवस सोडून चार दिवस बँकांना सुट्टी होती. या दरम्यानही शहर-परिसरातील काही एटीएम कॅशलेस झाली होती. मार्चएण्डच्या धावपळीत बँकांच्या व्यवस्थापनानेही पैसे भरण्याकडे  दुर्लक्ष केले होते. आता एप्रिलच्या अखेरीसही तीच स्थिती आहे.बँकांनी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खडेबाजार, मारुती गल्लीतील एटीएममध्ये अपुरा चलन पुरवठा केला होता. यानंतर शहर-उपनगरातील काही बँकांचे एटीएम सातत्याने अधूनमधून बंद आहेत. काही एटीएम कॅशलेस तर काही एटीएम ऑफलाईन अशी स्थिती आहे. या ढिसाळ नियोजनामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. मार्चएण्डच्या काळात दिवस एटीएम सेवेत व्यत्यय आला तरी ग्राहक बँकांची अडचण समजून घेण्याची तयारी असते. मात्र गेला महिनाभर अशीच परिस्थिती असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

ग्रामीण भागातही तीच स्थिती

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही अशीच अवस्था आहे. बहुतांश एटीएमवर ऑफलाईन वा नो कॅश असे फलक झळकत आहेत. देशात कर्नाटकासह, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम, बिहार या राज्यात अशीच स्थिती आहे.

कारणे काय?

जिल्ह्यासह राज्यात काही मोठ्या बँकांतून आर्थिक घोट्याळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे ठेवीदारात भीतीचे वातावरण आहे. या कारणानेही ठेवीदार आपले पैसे बँकांतून काढून घेत आहेत.  कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने एटीमला पैसे भरणार्‍या एजन्सींना निवडणूक अधिकार्‍यांच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागत आहे. त्यामुळेही चलन पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Tags : Belgaum, City, ATM, still, cashless