Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Belgaon › मंडळांना भासतेय कार्यकर्त्यांची वानवा

मंडळांना भासतेय कार्यकर्त्यांची वानवा

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:01PMबेळगाव : प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्त्यांची धडपड...उत्साहाला उधाण...नियोजनाची लगबग...गल्लीत चाललेली धावपळ...मोठ्यापासून लहानग्यांचा असणारा सहभाग...मंडप घालण्यासाठी करावी लागणारी कसरत...हे दृश्य एकेकाळी शहरातील गल्लीबोळातून दिसून येत असे. यातून गणेशोत्सवाची चाहुल लागत असे. पण आता मंडळांना कार्यकर्त्यांची वानवा भासत आहे.

काळाच्या ओघात असे चित्र विरळ होत चालले आहे. एकेकाळी गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्ते  घडविण्याची कार्यशाळा म्हणून ओळखली जात असे. गल्लीत साजरा होणार्‍या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक घरातील युवक, ज्येष्ठांचा सहभाग राहत असे. वर्गणी जमा करण्यापासून मंडपाची उभारणी करण्यापर्यंत, गणेशमूर्तीची स्थापना करण्यापासून विसर्जनाची मिरवणूक पार पडेपर्यंत प्रत्येकाचा सहभाग असायचा. यातून कार्यकर्त्यांची जडणघडण होत असे. सांघिक भावना वाढीला लागत असे.

बेळगाव शहराला गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाचा फार मोठी परंपरा लाभली आहे. शहरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव 1926 साली कडोलकर गल्ली येथील स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव याळगी यांच्या वाड्यात  सुरू झाला. त्यानंतर 1927 साली लोकमान्य टिळक यांनी उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. तेथून उत्सवाचा विस्तार झाला. सध्या महाराष्ट्राखालोखाल बेळगावात गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्याला उत्साहाची किनार आहे.

उत्सवातून कार्यकर्ते तयार होत असत. उत्सवात सहभागी झालेले कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत. उत्सवाच्या माध्यमातून  देशभक्तीचा जागर घडविण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यात आले. उत्सवाच्या दरम्यान होणारी व्याख्याने, जागृती, मेळे यातून समाजजागृती घडविण्यात येत असे. स्वातंत्र्यलढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यालाही या उत्सवांची मदत झाली. उत्सवाच्या माध्यमातून तयार झालेले कार्यकर्ते सीमाप्रश्‍नाच्या लढ्यातही सहभागी होत आले. यातून अनेकांनी राजकीय, सामाजिक चळवळीत भाग घेतला. मराठी माणूस उत्सवप्रिय म्हणून ओळखला जातो. शहरातील इतर भाषकांच्या तुलनेत मराठी माणूस उत्सवात अधिक प्रमाणात सहभागी असतो. यातूनच त्याची जडणघडण होते.

परंतु, अलीकडच्या काळात सार्वजनिक मंडळांना कार्यकर्त्यांचा तुटवडा भासत आहे. नवी पिढी करिअरला प्राधान्य देत आहे. यातून समाजात नव्या कार्यकर्त्यांची चणचण भासत आहे. चळवळीत नवीन कार्यकर्ते अपवादाने येत आहेत. यामुळे  मंडळाच्या कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. यातून मंडप उभारणीपासून सर्वच कामांचे कंत्राट देण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे.