Thu, Aug 22, 2019 13:17होमपेज › Belgaon › तिळगुळात दागिन्यांची कलाकुसर

तिळगुळात दागिन्यांची कलाकुसर

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 9:30PM

बुकमार्क करा

बेळगाव : सतीश जाधव
 

संक्रांतीच्या निमित्ताने 1948 पासून तिळगुळात दागिने बनविण्याची परंपरा येथील विजय परांपजे व कुटुंबियांनी जपली आहे. तिळगुळाच्या विविध दागिन्यांना देशासह विदेशातूनही मागणी आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी हा व्यवसाय चालविला आहे. दरवर्षी संक्रांतीच्या महिनाभर आधी दागिने तयार केले जातात.  देशापांडे गल्लीत 1948 पासून विजय परांजपे यांच्या आई अन्नपूर्णा (कमलाबाई) परांजपे यांनी या कलेला सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे 70 वर्षे झाली. या कलेला विजय यांनी जपले आहे. तिळगुळात दागिने बनविण्यासाठी विजय यांच्या मदतीला डॉ. मिलिंद परांजपे, शांताबाई पाटील आणि शशिकला कुलकर्णी मदत करतात. सण व समारंभात लोकांना हे दागिने घालून फिरता, यावे यासाठी दागिने तयार केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

  
या ठिकाणी लहान मुलांसाठीचा सेट तीनशे रुपये, विवाहिता तसेच नवरदेवाच्या दागिन्यांचा सेट 1400 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.  यामध्ये  किरीट 100, लहान हार 100, मोठा हार 300, तोडे 100, बांगड्या 100, नेकलेस 150 आणि मंगळसूत्र 100, बाजुबंध 100, कानातले, कंमरपट्टा 300, मनगट्या व अंगठी प्रत्येकी 50 रुपये, तुरा आणि नवर्‍याचा हार प्रत्येकी 200 रुपये आदी प्रकारात व किमतीचे दागिने बनविले जातात. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तसेच महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातून दागिन्यांना मागणी असते. इतर देशात, राज्यात दागिने पाठविताना पॅक करून तसेच दागिने खराब होऊ नये म्हणून चिरमुर्‍यातून पॅक करून पाठविले जाते. दागिने बनविण्यासाठी साखर, छोटे साबुदाणे, नायलॉन साबुदाणे, चांदी पेपर, किरीट कागद, कापडी फुले, टिकल्या व सुईदोरा आदी साहित्याचा वापर केला जातो.  पूर्ण सेट करण्यासाठी तीन दिवस लागतात. यासाठी लागणारी फुले पुण्याहून आणली जातात.