Mon, Jun 24, 2019 17:05होमपेज › Belgaon › उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटात चुरस

उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटात चुरस

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:40PMबेळगाव : महेश पाटील

बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून महापौरपद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आल्याने मराठी भाषिकांची सत्ता असूनही मराठी गटातील नगरसेविका नसल्याने हे पद विरोधी गटाला मिळणार आहे. मात्र, उपमहापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने सत्ताधारी गटात या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. 

महापौर पदासाठी केवळ दोन महिला चर्चेत आहेत. मात्र, त्याऐवजी उपमहापौर पदाला महत्व प्राप्त झाले आहे. महापौर आरक्षणामुळे विरोधी पक्षाला मिळत असले तरी यापुढे सत्ताधारी गटाला हाताशी धरूनच सर्व निर्णय घ्यावे लागणार आहेत. एकूण 58 नगरसेवक असलेल्या महानगपालिकेच्या सभागृहात 32 नगरसेवक मराठी भाषिक आहेत तर उर्वरित कन्नड आणि उर्दू भाषिक आहेत. त्यामुळे महापौर जरी विरोधी गटाचा झाला तरी वर्चस्व हे सत्ताधारी गटाचेच राहणार आहे.

32 नगरसेवक असलेल्या सत्ताधारी गटामधून नगरसेविका मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे या दोघींमध्ये उपमहापौरपद मिळविण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. याचप्रमाणे मेघा हळदणकर, मीना वाझ याही रिंगणात असल्या तरी मागील महापौरपदाच्या परिस्थितीनुसार आता मीनाक्षी चिगरे आणि मधुश्री पुजारी या दोघींमध्ये या पदासाठी रस्सीखेच निर्माण झालेली आहे.

विरोधी कन्नड आणि उर्दू गटाला महापौर पद मिळत असल्याने उपमहापौर पद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहे. याकरिता नगरसेविका पुष्पा पर्वतराव आणि शांता उप्पार व जयश्री माळगी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या निवडणुकीत मराठी भाषिक गट एकत्रित राहणार असल्याने उपमहापौरपद मराठी गटाला मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये उपमहापौर पदासाठी प्रत्येकी तीन नगरसेविका रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्र. 13 मधुश्री पुजारी, प्रभाग 26 मधील मेघा हळदणकर,  प्रभाग क्र. 48 मधील मीनाक्षी चिगरे यांच्यासह प्रभाग क्र. 53 पुष्पा पर्वतराव, प्र. क्र. 54 शांता उप्पार आणि जयश्री माळगी या सदस्या आघाडीवर आहेत.