Sat, May 30, 2020 10:09होमपेज › Belgaon › संमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा!

संमेलनांनी पुरवावी वर्षभराची ऊर्जा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

बालसाहित्य संमेलन आणि कारदगा साहित्य संमेलनाने सीमाभागातील यंदाच्या संमेलन पर्वाची नांदी वाजली आहे. अद्यापही आठपेक्षा अधिक मराठी साहित्य संमेलनांचा जागर होऊ घातला आहे. सामाजिक आणि वैचारिक बदलांसाठी संमेलने संप्रेरकाची भूमिका बजावतात. त्यामुळे साहित्याच्या जागराबरोबरच समाजजीवनाला ऊर्जा पुरविण्याचे काम संमेलनांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.

सीमाभागातील अनेक गावांत गेल्या अनेक वर्षापासून मराठी साहित्य संमेलने भरवून विद्यार्थी, वाचक आणि साहित्यिक यांच्यात संवाद प्रस्थापित करण्याचे कार्य केले जाते. ही संमेलने अधिक परिणामकारक होण्यासाठी आयोजनात सुसूत्रता असणे गरजेचे आहे. संवाद आणि चर्चांमधून साहित्याचे नेमकेपण आणि वैचारिक मांडणी अपेक्षित आहे. ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, शिक्षक, नवोदित लेखक-कवी आणि सर्वसामान्य वाचक संमेलनास गर्दी करतात. त्यामुळे तरुण-तरुणींना करिअरच्या वाटा दाखविणार्‍या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर सत्रांचेही आयोजन करणे उचित ठरणार आहे.

सीमाभागातील संमेलने ही सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात ऊर्जाकेंद्रे म्हणून महत्त्वाचे कार्य बजावतात. सीमाभागातील बहुतांश सर्वच संमेलनातून सीमाप्रश्‍नाचा जागर केला जातो. प्रत्येक संमेलनाध्यक्षांकडून आपल्या भाषणात सीमाप्रश्‍नाचा उल्लेख केला जातो. परिणामी सीमाचळवळीला बळ देण्याचे कार्यही संमेलनांकडून होत आहे.

मागील संमेलनाच्या साहित्यिक विचारांवर आणि रंगलेल्या सत्रांवर पुढील संमेलनाची गर्दी अवलंबून असते. विविध पातळ्यांवर वाचकांच्या अभिरुचीची आणि वैचारिक मशागतीची गरज ओळखून   सत्रांचे खुबीने नियोजन करणे आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत आणि वाचकांपासून ते नवोदित लेखकांपर्यंत सर्व प्रकारच्या  रसिकांना संमेलनातून वैचारिक खाद्य पुरविण्याचा प्रयत्न गरजेचा आहे.

ज्या भागात संमेलन होत आहे. तेथील जनतेच्या भाव-भावनांशी त्याच्या दैनंदिन जगण्यातील समस्यांवर  नेमकेपणाने भाष्य करुन नवी दृष्टी देण्याचे कार्य संमेलनाचे अध्यक्ष  करत असतात.  त्यामुळे चिकित्सक पद्धतीने विचारांची सुरेख मांडणी अध्यक्षीय भाषणांत अपेक्षित असते. स्थानिक परिसर आणि समाजाबाबत बाहेरुन आलेल्या साहित्यिकांना पुरेशी माहिती दिल्यास  श्रोत्यांची  काहीवेळा रटाळ भाषणांनी होणारी निराशा टाळता येते.

संमेलनांना महिलावर्गाचीही लक्षणीय उपस्थिती असते. महिला संघटनाच्यादृष्टीने नारीशक्तीच्या संवर्धनाचे आणि यशवंतांच्या जीवनगाथांचे उपक्रमही फायदेशीर ठरु शकतात. त्यामुळे केवळ मनोरंजन आणि टिपीकल संमेलनांचा इव्हेंट न मांडता समाजोपयोगी भूमिकेतून नेटके आयोजन काळाची गरज आहे. साहित्यातून माणसाच्या मनाची मशागत जितक्या चांगल्या पद्धतीने होते. तेवढी अन्य कोणत्याच मार्गाने होऊ शकत नाही.  त्यामुळे केवळ साहित्यिक सोहळा म्हणून संमेलनांकडे न पाहता समाज बदलाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहणे आवश्यक आहे.