Sun, Aug 25, 2019 12:43होमपेज › Belgaon › जिल्हा निर्मिती, बेरोजगारी, बंधारे  उभारण्याचे आव्हान

जिल्हा निर्मिती, बेरोजगारी, बंधारे  उभारण्याचे आव्हान

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 12:04AMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

चिकोडी-सदलगा मतदारसंंघ जिल्ह्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  अटीतटीच्या लढतीत दुसर्‍यांदा काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी निवडून आले. मागच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून प्रत्येक गावागांवात अनेक विकासकामे राबविली आहेत. पण मतदारसंघात अजूनही काही समस्या भेडसावत आहेत. चिकोडी -सदलगा निम्मा भाग नद्यांमुळे समृध्द तर काही भाग पावसावर अवलंबून आहे. मागच्या कालावधीत गणेश हुक्केरींनी रस्ते, गटारी, पथदीप, समुदायभवन, अनेक वसती शाळा, गंगाकल्याण योजना राबविली. शिरगांव, नाईंग्लज, काडापूर, मलिकवाडसह अनेक गावांमध्ये नदीच्या पाण्याने तलाव भरणी  करून शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणली.चिकोडीत भुयारी गटार योजना, 24*7 पाणी योजना, जीटीसीटी व केंद्रीय विद्यालय, हायटेक बस स्थानकासह अनेक कामे राबविली आहेत.

मतदारसंघात मूलभूत सुविधा सर्व गावांमध्ये पुरविल्या गेल्या असल्या तरी औद्योगिक वसाहतीची उभारणी, महालक्ष्मी जलसिंचन उपसा योजना, जिल्ह्याचा प्रश्‍न, बायपास रस्ता, मेडिकल व अभियांत्रिकी सरकारी महाविद्यालये यासह इतर समस्या सोडवण्याचे आव्हान हुक्केरींसमोर आहे.

महालक्ष्मी जलउपसा सिंचन योजना
माळभागावरील चिंचणी, कोथळी, नवलिहाळ, खडकलाट, नाईंग्लज, पट्टणकुडी, वाळकी, रामपूर सह 12 खेड्यांमधील शेतकर्‍यांना कृष्णेचे पाणी उपसा करुन शेतजमिनींना पाणी देण्यासाठी महालक्ष्मी जलसिंचन उपसा योजना गणेश व खा. प्रकाश हुक्केरींनी  शासनाकडून मंजूर करुन आणली. या कामाचे  टेंडर झाले आहे, मात्र काम सुरु झालेलेे नाही.  मागच्या सरकारातील जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांनी  काम पूर्ण करण्याचे अश्‍वासन दिले होते. यामुळे हुक्केरींसमोर 5 वर्षात योजना पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

चिकोडी जिल्ह्याचा प्रश्‍न
दोन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करुन नव्या चिकोडी  जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी प्रलंबित आहे. यापूर्वी 1997 साली तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी चिकोडी जिल्हा जाहीर करुन 24 तासात मागे घेतले होते. तेव्हापासून चिकोडी जिल्ह्याची मागणी होतच आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. यंदा जानेवारीपासून आचारसंहिता लागू होण्यापर्यंत तब्बल 55 दिवस धरणे, सत्याग्रहसह साखळी उपोषण बी. आर. संगाप्पगोळ यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. मागच्या पोटनिवडणुकीत जाहीरनाम्यात चिकोडी जिल्हा निर्मितीचा मुद्दा होता.

औद्योगिक वसाहत, रोजगार निर्मिती
तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगारासाठी सुशिक्षित कुशल तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात शेजारच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील  औद्योगिक वसाहतीत कामासाठी जातात. तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण व महिलांची संख्या आहे. यामुळे मतदारसंघातच एमआयडीसीच्या धर्तीवर उद्योगधंदे आणून औद्योगिक वसाहतीची उभारणी गरजेची आहे.

मेडिकल व अभियांत्रिकी महाविद्यालय
चिकोडी जिल्हास्तरीय शहर म्हणून विकसित होत आहे. चिकोडीसह उपविभागाच्या विकासासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. पण खासगी संस्थांची भरमसाट फीवाढ व डोनेशनमुळे सामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित होत आहे. मागील नोव्हेंबरमध्ये चिकोडीत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना खा. प्रकाश हुक्केरींनी चिकोडीत सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली होती.  त्याचा पाठपुरावा करत यंदाच्या  सरकारकडून दोन्ही महाविद्यालये चिकोडीत मंजूर करुन आणण्याची जबाबदारी आ. हुक्केरींवर आहे.

बायपास रोडची गरज
चिकोडी शहर शैक्षणिक, आरोग्य, परिवहन जिल्हा केंद्र म्हणून यापूर्वीच जाहीर झाला आहे. शहरात अनेक जिल्हास्तरीय कार्यालये, न्यायालय, महाविद्यालये, इस्पितळ व बाजारपेठ असल्याने शहराचा विस्तार, लोकसंख्येसोबतच वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्ते अद्यापही अरुंद असल्याने वारंवार शहरात वाहतीकीची कोंडी होत आहे. यात मुख्य बाजारपेठ असलेल्या गुरुवार पेठ रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. गोटूर-जेवरगी राज्य महामार्ग शहरातून जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. 

बंधारे व पुलांची निर्मिती
मतदारसंघात कृष्णा, दूधगंगा नद्या वाहत असून पावसाळ्यात नद्यांना महापूर येत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. यासाठी कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर बंधार्‍याची उंची वाढविण्याची योजना मागच्या सरकारकडून खासदार व आमदार हुक्केरींनी मंजूर करून आणली. पण अद्यापही त्याचे काम सुुरु नाही. महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणार्‍या कृष्णा नदीवरील चंदूर-टाकळी पुलाचे काम मागील वर्षापासून सुरु असून अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे या कालावधीत कल्लोळ-येडूर बंधार्‍याची उंची व चंदूर-टाकळीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.