होमपेज › Belgaon › चिकोडी नगरपालिका निवडणूक : वजनदार नेत्यांच्या मनधरणीसाठी कसरत

चिकोडी नगरपालिका निवडणूक : वजनदार नेत्यांच्या मनधरणीसाठी कसरत

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:18PMचिकोडी : प्रतिनिधी

लक्षवेधी ठरलेली चिकोडी नगरपालिका निवडणूक काँग्रेस व भाजपच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्हास्तरीय स्थान लाभलेल्या चिकोडी शहरावर सत्ता प्रस्थापित दोेन्ही पक्षाचे नेतेे वॉर्डांमध्ये वजन असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी कसरत करत आहेत. 23 वॉर्डांपैकी 6 वॉर्डांमध्ये थेट लढत तर 5 वॉर्डांमध्ये तिरंगी लढत होत आहे.

23 सदस्यांची संख्या असलेल्या चिकोडी नगरपालिकेत सत्तेवर येण्यासाठी भाजप व काँग्रेस नेते स्थानिक वर्चस्व असलेल्या भावा -भावांना, पती-पत्नींना रिंगणात उतरुन घराणेशाहीवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ही निवडणूक आ. महांतेश कवटगीमठ, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, जगदीश कवटगीमठ यांना भाजपच्या अस्तित्वाची ठरणार आहे.  दुसरीकडे खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरींना स्वत:चे वर्चस्व सिध्द करण्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

मागील 25 वर्षांपासून कवटगीमठ बंधूंच्या ताब्यात असलेली नगरपालिका मागील निवडणुकीत हुक्केरी पिता-पुत्रांनी आपल्या ताब्यात घेतली. पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपचे महांतेश कवटगीमठ, अण्णासाहेब जोल्ले व जगदीश कवटगीमठ प्रत्येक वॉर्डात जोरदार प्रचार करत आहेत. खा. प्रकाश हुक्केरी व आ.गणेश हुक्केरी स्थानिक नेत्यांनी पाच वर्षात राबविलेल्या विकासकामांव्दारे घरोघरी प्रचार करत आहेत. 

पती-पत्नी रिंगणात

भाजपचे विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचे भाऊ जगदीश कवटगीमठ हे भाजपप्रणित गटाकडून वॉर्ड क्र.22 मधून निवडणूक लढवित आहेत. त्यांची पत्नी वीणा कवटगीमठ वॉर्ड क्र.20 मधून रिंगणात आहेत. दुसरीकडे चुलत भाऊ संजय कवटगीमठ वॉर्ड क्र.5 मधून उभे आहेत.

एकाच वॉर्डातून चार माजी नगराध्यक्ष  

वॉर्ड क्र.22 मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत आहे. या वॉर्डातून चार माजी नगराध्यक्ष रिंगणात आहेत. यात भाजपचे माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र नेर्लीकर, प्रभाकर ई कोरे, रामा लिंबाजी माने आदींचा समावेश आहे. 

भावांचा एकमेकांविरोधात शड्डू 

शहरातील मराठा समाजाचे नेतेे रामा लिंबाजी माने काँग्रेसकडून व त्यांचे चुलत भाऊ विक्रांत सय्याजी माने हे वॉर्ड क्र .17 रामनगरमधून  निवडणूक लढवित आहेत. दोघा भावांच्या चुरशीच्या लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे.

आई-मुलगा रिंगणात

काँग्रेसप्रणित उमेदवार नूरजहान मुर्तूजा जमादार या वॉर्ड क्र.14 मधून तर  त्यांचा मुलगा साबीर जमादार  वॉर्ड क्र.15 मधून निवडणूक लढवित आहेत.