Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Belgaon › जिल्हा मागणीसाठी चिकोडी बंद कडकडीत

जिल्हा मागणीसाठी चिकोडी बंद कडकडीत

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:03AM

बुकमार्क करा

चिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी बुधवारी पुकारलेल्या चिकोडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 पासून व्यवहार बंद ठेवून दुकाने, शाळा, कॉलेजसह, बससेवा बंद होती. दुपारी 12 वा.  बसस्थानक चौकातून के.सी.रस्ता, पालिका चौक, गुरुवार पेठ, कृष्ण चौकातून बसव सर्कलपर्यंत रॅली काढण्यात आली. बसव सर्कल येथे  3 तास धरणे धरण्यात आले. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना जिल्हा मागणीचे निवेदन सादर करण्यात आला.

आ. दुर्योधन ऐहोळे म्हणाले चिकोडी जिल्ह्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीला घोषणा न झाल्यास बेमुदत  उपोषणात सहभागी होऊ.

बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले चिकोडी जिल्हा निर्मिती झाल्यास अथणी, रायबाग तालुक्यातील अनेक गांवांचा विकास होणार आहे. 26 जानेवारीपूर्वी जिल्ह्याची घोषणा करावी अन्यथा उपोषण करू. संपादना स्वामीजी, अंजुमनचे ईसा नाईकवाडी, रामा माने, आर.आर.पाटील, महावीर मोहिते यांनी मनोगत व्यक्त करत जिल्हा झालाच पाहिजे, अशी मागणी केली. दतू हक्यागोळ, जयकुमार खोत, नरेंद्र नेर्लीकर, काशिनाथ कुरणे, संजू बडिगेर, प्रा.एस.वाय.हंजी, विक्रम बनगे, अक्रम अरकाटे, सतीश अप्पाजीगोळ, महेश भाते, अनिल माने, संतोष सोलापूरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.  बंदमुळे शहरातून येणारी वाहतूक बंद केली होती. हुक्केरी मार्गावरील बस, इतर वाहने संकेश्‍वर क्रॉसवर तर कागवाड, मिरजकडून येणारी वाहने कोरे पॉलिटेक्निकजवळ व एकसंबाकडून येणारी वाहने टेकडी तकियानजीक, निपाणीकडून येणारी वाहने चौसन हिलजवळ वाहने थांबविण्यात आली होती. प्रवाशांना, विद्यार्थी, नोकरदारांना चालत यावे लागले.

निवेदन देताना माजी आ. बाळासाहेब वड्डर म्हणाले, सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊ नये अश्रह बेळगाव येथे पाटील पुटाप्पा, रुद्राक्षीमठ स्वामीजींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. काही व्यापार्‍यांच्या फायद्यासाठी चिकोडी जिल्ह्यास विरोध होत आहे. जिल्ह्यास कुणीही विरोध करू नये.