Mon, Aug 19, 2019 05:55होमपेज › Belgaon › मुख्यमंत्री सिध्दरामय्याच काँग्रेसचे तारणहार!

मुख्यमंत्री सिध्दरामय्याच काँग्रेसचे तारणहार!

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:26AMगुलबर्गा : गुरैय्या रे स्वामी

कर्नाटकाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत त्रिपुराची पुनरावृत्ती होणार की भाजपचा विजयरथ सत्ताधारी काँग्रेस पक्ष कर्नाटकातच रोखणार, याबद्दल देशभरातील लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तर भाजप ऑपरेशन कमळच्या तयारीत असल्याचे समजते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय झंझावतामुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात काँग्रेस अस्तित्वात राहाणार की नाही हाच प्रश्‍न सर्वांना सतावतो आहे. 

देशातील जनतेला मोहमयी जगताची आशा दाखवत एकेक राज्य करीत संपूर्ण देशच ताब्यात घेतला तर देशाच्या रानावनातही काँग्रेस उगवणार नाही. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या श्रीकृष्णाच्या रूपात काँग्रेस पक्षाचे संरक्षण करतील असे पक्षश्रेष्ठींना वाटते.

कर्नाटकाप्रमाणेच देशातील अनेक राज्यात अस्तित्वात असलेले प्रादेशिक पक्ष ज्या त्या राज्यात तसे भक्कम स्थितीतच आहेत. भाजप हा एक हिंदुत्ववादी पक्ष असून काँग्रेसप्रमाणे देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष पुरोगामी व समाजवादी विचारसरणीचे आहेत. भाजप नेत्यांनी नेमका हाच आराखडा नजरेसमोर ठेवून ज्या त्या राज्यात राजकारण चालवले आहे. 

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप आज नेमस्त पध्दतीने राजकारण न करता अत्यंत आक्रमक प्रचार करीत आहेत. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मागील पाच वर्षात राज्यात विकासकामे करण्याबरोबरच अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. इतकेच नव्हे तर राज्यातील अहिंद म्हणजे अल्पसंख्यांक, हिंदुळीद(मागासवर्गीय),दलित मतदारांना आपल्याबरोबर ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपची घौडदौड कर्नाटकात थांबविण्यात सिध्दरामय्या यशस्वी होतील, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

प्रादेशिक पक्षांची खेळी

कर्नाटकात एकेकाळी प्रबळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या निधर्मी जनता दलाची अवस्था आता थकलेल्या हत्तीप्रमाणे झाली आहे. पण बसपबरोबर समझोता करून हत्तीचे बळ असल्याचे दाखवत आहेत. तथापि, निधर्मी जनता दल व काँग्रेस पक्षांच्या विचारधारा एकसारखी असल्याने उभय पक्षात फूट पडून त्याचा थोडाफार फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारताही येत नाही. 

भाजपमध्ये मतभेद

भाजपातील अंतर्गत कलह आज दिसत नसले, तरी उमेदवारांची घोषणा होताच मतभेद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदेश भाजपाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर अंकुश ठेवण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार येडियुरप्पा यांच्यासह कोणत्याही नेत्यांकडे ठेवले नाही. अमित शहा यांनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवल्याने कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला मिळणार नाही याबाबतीत छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाही.

काँग्रेसची यादी कधी?

काँग्रेसतर्फे निवडून येतील अशा 100 उमेदवारांची यादी तयार असून राज्यसभा निवडणुका झाल्यानंतर उमेदवार घोषित करतील असा अंदाज आहे. भाजप आणि जनता दलातील काहीं नेते सिध्दरामय्या यांच्या संपर्कात असल्याचे स्वत: सिध्दरामय्या यांनीच घोषित केल्याने उभय पक्षात भीतीचे वातावरण आहे.निधर्मी जनता दलाने पहिल्या यादीत सुमारे 70 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र बहुतेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच सरळ लढत होईल तर काहीं ठिकाणी निधर्मी जनता दलाचा प्रभाव असल्याने तिरंगी लढत होणार आहे.इतर पक्षांचा प्रभाव नसल्याने कर्नाटकचे राजकारण तीन पक्षाच्या भोवतीच घिरट्या घालत असते हे मात्र नक्की.