होमपेज › Belgaon › मुख्यमंत्रिपद कार्यकाळाचे 30-30 महिने वाटप नाही

मुख्यमंत्रिपद कार्यकाळाचे 30-30 महिने वाटप नाही

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:18PMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस आणि निजदमध्ये मुख्यमंत्रिपद प्रत्येकी 30 महिन्यांसाठी वाटून घेण्याचा कसलाही समझौता झालेला नाही, पाच वर्षांसाठी म्हणजे 60 महिन्यांसाठी मीच मुख्यमंत्री राहीन, असा दावा निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.श्रीरंगनाथ स्वामी देवालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असेन अशी ग्वाही काँग्रेसने मला दिली आहे. त्यामुळे कार्यकाळाचे वाटप करण्याचा प्रश्नच नाही. शिवाय इतर मत्रिपदांबाबत अजून चर्चा व्हायची आहे. कुणाकडे कोणती खाती याबाबत प्राथमिक चर्चाही झालेली नाही. शपथविधीनंतर दोन्ही पक्षांना मंत्रिपदे कितीकिती, खाती कोणकोणती यावर चर्चा होईल.

20-20 ची आठवण

काँग्रेसने प्रत्येकी 30 महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरलेला नाही. त्यांनी निजदला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तशी घोषणा 15 मे रोजी निवडणूक निकालानंतर लगेच काँग्रेसने केली होती. स्वतः सिद्धरामय्यांनीच पत्रकार परिषदेत ती घोषणा केली.काँग्रेसने निम्म्या कालावधीसाठीही मुख्यमंत्रिपदाचा आग्रह न धरण्यामागे निजद-भाजपच्या 20-20 सूत्राचे कारण असण्याची शक्यता आहे.2006मध्ये निजद आणि भाजपची युती झाली आणि त्यांनी काँग्रेसप्रणित एन. धरमसिंग सरकार पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने कुमारस्वामी पहिल्यांदा मुख्यमंत्रि झाले. त्यावेळी तत्कालीन विधानसभेचा 40 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. तो निजद आणि भाजप यांनी प्रत्येकी 20 महिने याप्रमाणे वाटून घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. तथापि, 20 महिन्यांतर ऑक्टोबर 2007मध्ये भाजपला मुख्मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा कुमारस्वामींनी माघार घेतली आणि पद सोडण्यास नकार दिला. त्यामुळे युती सरकार अल्पमतात आले. आणि 2008मध्ये कर्नाटकात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक झाली. 

युती करताना कार्यकाळाचे निम्मे-निम्मे वाटप करण्यास संमती देऊनही निजदने नंतर ते वचन पाळले नाही. त्यामुळेच काँग्रेनसने कार्यकाळाच्या वाटपाविषयी चर्चा केलेली नाही, असे मानले जाते. कुमारस्वामी आता तयार झाले तरी अडीच वर्षांनी काय स्थिती असेल, हे कोणीच सांगू शकणार नाही. शिवाय, वचनभंगाचा इतिहास ताजा असल्यामुळे पुन्हा मुदतपूर्व निवडणुका नको, असा विचार करून काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची वाटणी मागितली नसल्याचे मानले जाते.