Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Belgaon › धाकट्या पातींची हुकलेली लढत

धाकट्या पातींची हुकलेली लढत

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 9:19PMबेळगाव : शिवाजी शिंदे

राज्याच्या राजकारणात कार्यरत असणार्‍या थोरल्या पातीच्या वारसांची अर्थात धाकट्या पातीची हुकलेली लढत म्हणून वरुण मतदारसंघाकडे पाहण्यात येते. तरीदेखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांची राजकीय कसोटी या मतदारसंघात लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पांचे पुत्र विजयेंद्र यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे एक होता, होता राहिलेली लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वत:ला भूमिपुत्र असे वारंवार म्हणवून घेत असतात. त्यांचा हा हक्काचा मतदार संघ. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत येथूनच विजय मिळविला होता. त्यावेळी त्यांनी मतदारासमोर जाताना ही माझी अखेरची निवडणूक असल्याचे भावनिक आव्हान केले होते. येथील मतदारांनी त्यांना भरभरून मतदान केले. यामुळे मागील पाचवर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 

यंदा सिद्धरामय्यांंनी आपला मतदारसंघ बदलला आहे. त्यांनी आपला मुलगा यतिंद्र याला उमेदवारी मिळवून दिली आहे. आपला परंपरागत मतदारसंघ  मुलाकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांनी तयारी चालविली आहे.मुख्यमंत्री पुत्राच्या विरोधात भाजपकडून येडियुराप्पा पुत्र विजयेंद्र यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न चालविले होते. मात्र भाजपने उमेदवारी नाकारली. परिणामी विजयेंद्रसमर्थक संतप्त बनले. काहीनी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली, पोलिसांना लाठीमार करावा लागला. भाजपने टी. बसवराज  यांना उमेदवारी दिली आहे. तर निजदतर्फे अभिषेक हे उमेदवार आहेत. 

यतिंद्र यांच्या उमेदवारीने याठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्रीपुत्राला पराभव चाखायला लावण्याचा चंग बांधला आहे. यामुळे काँग्रेसकडूनही दिग्गजांना प्रचारासाठी पाचारण करण्यात आले आहे.

जातीय समीकरणे

मतदारसंघात जातीय समिकरणे महत्त्वाची मानण्यात येतात. लिंगायत मतदार सर्वाधिक असून त्यांनी आजपर्यंत भाजपला साथ दिली आहे. परंतु स्वतंत्र धर्माच्या मुद्यावर मतामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी 55 हजार लिंगायत, 12 हजार वक्कलिग, 35 हजार कुरुब, 43 हजार अनुसूचित जाती, 23 हजार अनुसूचित जमाती, 12 हजार इतर मागासवर्गीय मतदार आहेत.काँग्रेसला आजवर कुरुब, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास व पारंपारिक मतदारांनी साथ दिली आहे. भाजपकडे लिंगायत तर वक्कलिग समाज निजदकडे आहे. या जातीय समीकरणावर उमेदवारांचा विजय अवलंबून राहणार आहे.

2013 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या यांनी 29 हजार मतानी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र हे मताधिक्य टिकविण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत.  निजदचा उमेदवार किती मते घेतो यावर काँग्रेसचा विजय अवलंबून राहणार आहे.