Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Belgaon › जातनिहाय हिशेब यशस्वी होणार?

जातनिहाय हिशेब यशस्वी होणार?

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 9:27PMबदामी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि खासदार श्रीरामुलू यांच्यात थेट लढत होत आहे. दोघांची भिस्त जातीच्या समिकरणावर आहे. दोघेही मतदारसंघाबाहेरील असल्याने निवडून आल्यानंतर ऐतिहासिक बदामीचा ते किती विकास करणार असा प्रश्‍न मतदारांसमोर आहे.

बदामी मतदारसंघात रिंगणात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भिस्त 46 हजार धनगर मतांवर आहे. शिवाय मुस्लीम, अनुसूचित जाती, जमाती, विणकर आणि लमाणी समाजबांधवांची 50 हजार मते, अशी एकूण 90 हजार मते मिळण्याचा विश्‍वास त्यांना आहे. ही एकगठ्ठा मते त्यांना मिळाली तर विजय निश्‍चित आहे. 

प्रचार करताना अन्नभाग्य मालिकेतील योजना व इतर विकासकामांचा आधार मुख्यमंत्री घेत आहेत. पण, ऐतिहासिक असणार्‍या बदामीच्या विकासाकडे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिले नाही. 
लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याची शिफारस कर्नाटकातील काँग्रेसने केंद्राकडे केली आहे. मात्र, बदामीतील शिवयोग मंदिरातील वीरशैव स्वामींनी त्यास विरोध केला आहे. न्यायमूर्ती सदाशिव आयोग अहवाल लागू न केल्याने मादीग समाजबांधव नाराज आहेत. केंद्राने आदेश दिला तरी वाल्मिकी समाजासाठी 7.5 टक्के आरक्षण लागू करण्याबाबत कर्नाटक शासनाने उदासीनता दाखविली. 
सिद्धरामय्यांचे प्रतिस्पर्धी श्रीरामुलू यांना मतदारसंघातील भाजपच्या राजकीय प्रभावाचा फायदा होणार आहे. पक्षातील मतभेद दूर करून खासदार पी. सी. गद्दिगौडर, माजी आमदार एम. के. पट्टणशेट्टी आणि महांतेश ममदापूर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रचार सुरू केला आहे. 

श्रीरामलू हे स्थानिक उमेदवार नाहीत. एकदा आमदार झाले की ते मतदारसंघात राहतीलच याची हमी नाही. यामुळे स्थानिकांकडून त्यांना कितपत पसंती मिळणार याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 
मतदारसंघात केवळ भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून चिम्मनकट्टी, पट्टणशेट्टी घराण्यांशिवाय येथे कुणीच आमदार बनू शकले नाही. येथील सहा जिल्हा पंचायत मतदारसंघांपैकी केवळ एकाच ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे. उर्वरित जागा भाजपकडे आहेत. तर तालुका पंचायतीतील 19 जागांपैकी केवळ दोनच जागा काँग्रेसकडे असून 17 जागा भाजपकडे आहेत. याआधी 2004 आणि 2008 मध्ये भाजप उमेदवार एम. के. पट्टणशेट्टी यांनी विजय मिळविला. 2013 मध्ये मात्र काँग्रेस उमेदवार बी. बी. चिम्मनकट्टी विजयी झाले.