Fri, Aug 23, 2019 23:38होमपेज › Belgaon › देवदासी निर्मूलन कार्याचा केंद्राकडून सन्मान

देवदासी निर्मूलन कार्याचा केंद्राकडून सन्मान

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 8:26PMचिकोडी : प्रतिनिधी

अडीच दशकापासून देवदासी  निर्मूलनासाठी झटणार्‍या तालुक्यातील कब्बूर येथील सीतव्वा जोडट्टी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. सीतव्वा जोडट्टी 1991 पासून देवदासी पध्दतीतून महिलांना मुक्त करून त्यांना आदरयुक्त जीवन जगण्याची प्रेरणा, जागृती करण्याच्या कार्यात गुंतल्या आहेत.  सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या माजी देवदासी सीतव्वा या देवदासींना यातून मुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सामाजिक सेवेत आहेत.  1997 साली घटप्रभा येथे स्वत:ची महिला विकास व संरक्षण संस्थेची (मास) स्थापना करून त्यांचे कार्य सुरू  झाले.  ‘मास’ संस्थेला युनायटेड किंग्डम, नेदरलँडकडून अर्थिक मदत मिळाली आहे. 2010 पासून कर्नाटक राज्य विकास निगमकडून संस्थेला दिली जाणारी अर्थिक मदत बंद झाली आहे.

यामुळे संस्थेला प्रभावी कार्य करण्यास आर्थिक समस्या भेडसावत आहे. सरकार व विनासरकारी संघ संस्था, देणगीदारांनी  मदत केल्यास इतर जिल्ह्यांमध्ये देवदासी पध्दत निर्मूलनासाठी काम करण्याचे ध्येय असल्याचे सीतव्वा सांगतात. बागलकोट, विजापूर, कोप्पळ आदी जिल्ह्यांमध्ये देवदासींना जागृती, प्रशिक्षण दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात कौशल्याधारित वस्तूंची निर्मिती, दुग्धोत्पादन, रेशीम व इतर औद्योगिक उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले आहे.    पद्यश्री पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्यामुळे समाधानी आहे.  आपल्या जबाबदारीही वाढली असल्याचे सीतव्वा यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.