Fri, Mar 22, 2019 08:04होमपेज › Belgaon › आदर्श समाजासाठी एकसंध होणे आवश्यक 

आदर्श समाजासाठी एकसंध होणे आवश्यक 

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 8:05PMचिकोडी : प्रतिनिधी

संघाचा स्वयंसेवक समाजासाठी आदर्श आहे. राष्ट्रधर्म, समाजसेवेसाठी त्यांनी स्वत:ला अर्पण केले आहे. केवळ फुले उधळून, घोषणा देऊन राष्ट्रबांधणीचे कार्य पूर्ण होत नाही. प्रत्येकाने जात, धर्म, भाषा, अस्पृश्यता, प्रांतभेद बाजूला सारुन एकसंध होणे गरजेचे असल्याचे मत विश्‍व हिंदू परिषदेचे संघटना मंत्री गोपाल यांनी व्यक्त केले. शहरातील किवड मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित जिल्हा मेळावा व पथसंचलन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. संपूर्ण समाजात परिवर्तन होण्यासाठी प्रत्येकांनी कर्तव्य भावनेने देशसेवा करावी हा डॉ. हेडगेवारांचा संकल्प आहे. तो सार्थ करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. 

डॉ. अभिनव ब्रम्हानंद स्वामीजी म्हणाले, आज स्वार्थासाठी अनेक संघ संस्था कार्यरत आहेत. पण देशसेवेसाठी कार्यरत असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही एकमेव संघटना आहे. भारत माता ही आपली असून तिचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित असून देशहितासाठी संघाची सर्वांनी कास  धरावी.  प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह एम. वाय. हारुगेरी यांनी केले. यावेळी संजय अडके, अमृत कुलकर्णी, आर. के. बागी, योगेश कुलकर्णी, गिरीश अश्‍वथपूर, सचिन कुलकर्णी, शशिकांत नाईक, आमदार पी. राजीव,  बापू औंधकर यांच्यासह 900 हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. 

शहरातून शानदार पथसंचलन 

शहरातील आर. डी. मैदानातून गणवेशधारी स्वयंसेवकांच्या पथसंचलनास सुरुवात झाली. भारत माता की जयसह विविध घोषणांनी शहरातील के. सी. रस्ता, प्रभूवाडी कॉर्नर, पालिका चौक, दत गल्ली, ओतारी गल्ली, जैन पेठ,डंबळकूट, सोमवारपेठ, गुरुवारपेठ, कोरेनगर असे किवड मैदानापर्यंत शानदार पथसंचलन झाले.