Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Belgaon › मोदीजी 15 लाखांचे काय

मोदीजी 15 लाखांचे काय

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 10:40PMचिकोडी, अथणी : प्रतिनिधी

प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो म्हणून सत्तेवर आलेले मोदीजी, त्या 15 लाख रुपयांचे काय झाले? 15 लाख मिळाले नाहीतच, उलट बँक घोटाळे करून देशाबाहेर पळून जाणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अभय देत आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकाच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून जनाशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यानिमित्त कर्नाटकाच्या दौर्‍यावर आलेले गांधी यांची शनिवारी अथणीत सभा झाली. त्या सभेत राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सिद्धरामय्या सरकारच्या योजनांचे कौतुक केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करताना भ्रष्टाचारांच्या आरोपावर चर्चा करण्यासाठी एकाच व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी वारंवार काँग्रेस भ्रष्ट असल्याचे सांगतात; पण त्यांच्याच व्यासपीठावर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात जाऊन आलेले भाजपचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांच्यासह इतर मंत्री दिसत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. घोटाळेबहाद्दरांना अभय नोटबंदी करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले, तर जय शहाची संपत्ती 50 कोटींवरून 80 हजार कोटी झाली. अनेक बँकांना गंडा घातलेले विजय मल्ल्या, क्रिकेट क्षेत्रात गैरव्यवहार केलेले   

ललीत मोदी व अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेचे 11 हजार कोटी बुडवलेले नीरव मोदी पळून गेले असताना पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली कारवाई करु, इतकेच सांगतात. काळा पैसा  आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करण्यासह वर्षाला 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या आश्‍वासनांचे काय झाले? केवळ जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करुन आज उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये दलित, आदिवासींना चिरडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 70 वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करत लोकांची दिशाभूल करीत मोदींनी केवळ बढाई मारणे सुरू केले आहे. त्यामुळे सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गृहमंत्री यांच्याकडे काय काम राहिले नसल्याचेही राहुल म्हणाले. 

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आ.सतीश जारकीहोळी, प्रदेश काँग्रेस महिला समिती अध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर, राज्य प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी मनोगत व्यक्‍त केले.  पालकमंत्री रमेश जारकीहोळी, राज्याचे निरीक्षक के. वेणूगोपाल, माजी केंद्रीय मंत्री के.एच.मुनियप्पा, उर्जामंत्री डी.के.शिवकुमार, वीरकुमार पाटील, श्रीमंत पाटील, खा.प्रकाश हुक्केरी, काकासाहेब पाटील, आमदार गणेश हुक्केरी, श्याम घाटगे, शहाजहॉन डोंगरगाव, रावसाहेब पाटील, विवेकराव पाटील, लक्ष्मण चिंगळे, मंत्री एस.आर.पाटील, मंत्री रोशनबेग, किरण पाटील उपस्थित होते.

आमची काम की बात

काँग्रेस हा सार्‍यांना सोबत नेणारा पक्ष असून चांगली वागणूक ही फक्‍त काँग्रेसची संस्कृती आहे. मन की बात आम्ही करीत नसून केवळ ‘काम की बात’ करतो. काँग्रेसने बसवेश्‍वरांच्या तत्त्वानुसार सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन साडेचार वर्षांत शेतकरी, महिला, युवावर्गाच्या कल्याणासाठी योजना राबवल्या. काही दिवसांपूर्वी मोदींनी बसवेश्‍वरांच्या ऐक्य स्थळाला भेट दिली होती; पण बसवेश्‍वरांचे नाव घेऊन ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मोदींनी बसवेश्‍वरांनी दिलेल्या शिकवणीचा बसवेश्‍वरांनी  चोरी, हिंसा करू नये, खोटे बोलू नये, बढाई करू नये, कोणावरही रागावू नये, समानता, बोले तैसे चाले या तत्त्वांचा पुरस्कार केला. मोदी सरकारची वाटचाल त्याउलट सुरू आहे, अशी टीकाही केली.