Wed, Jan 22, 2020 13:59होमपेज › Belgaon › उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रंगले धुमशान

उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रंगले धुमशान

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 18 2018 12:44AMबेळगाव : प्रतिनिधी

एकेकाळी आ. डी. बी. इनामदार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या कित्तूर विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारीसाठी झुंज द्यावी लागत आहे. इनामदार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांच्याच घरातून त्यांना आव्हान देण्यात आले असून यामुळे पक्षश्रेष्ठींनी अद्याप या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही. याचा लाभ भाजपकडून उठविण्याचा प्रयत्न होणार असून निजदही सक्रीय झाले आहे. यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ राखण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करावी लागणार आहे.

वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्यामुळे हा मतदारसंघ राज्यभर ओळखला जातो. या मतदारसंघाला ऐतिहासीक पार्श्‍वभूमी लाभली असून  एकेकाळी निजदचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. माजी मंत्री डी. बी. इनामदार हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी अनेक घटनामुळे ते वादग्रस्त बनले आहेत. यामुळेच पक्षातील काही नेत्यांनी त्यांना विरोध चालविला असून त्यांना उमेदवारी देण्याचे टाळले जात आहे. 

इनामदार यांना सध्या स्वत:च्या घरातूनच आव्हान मिळाले असून परिणामी त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. माजी जि. पं. सदस्य बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. परिणामी इनामदार यांना अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे कार्यकर्त्यातून सांगण्यात येत आहे.

सध्या काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून कार्यकर्ते व नेते दोन गटात विभागले गेले आहेत. दोन्ही गटाकडून उमेदवारीसाठी नेत्यांवर दबाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. यातून बंडखोरी करण्याचा इशारा दोन्ही बाजूंनी देण्यात आला असून नेत्यांना हे बंड थंड करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावरच उमेदवारांचे यश अवलंबून राहणार आहे.

काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा भाजपकडून उठविण्याचा प्रयत्न होणार आहे. याठिकाणी माजी आ. सुरेश मारिहाळ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून हिंदुत्वाच्या मुद्दावर विजय संपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निजदचा डोळा काँग्रेसमधील बंडखोरावर आहे. उमेदवारी नाकारलेल्यांना आपल्या जाळ्यात ओढून उमेदवारी देण्याचा प्रयत्न निजदकडून होणार आहे. यामुळे त्यांची भूमिका वेट अँड वॉच अशीच आहे. 

या मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निणार्यक आहेत. त्यांची संख्या अधिक आहे. निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी छेडण्यात आलेले आंदोलन आणि काँग्रेसने यासाठी घेतलेला पुढाकार काँग्रेसला फायदेशीर ठरतो की भाजपला तारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परिणामी लिंगायत उमेदवारामध्येच विधानसभेचा आखाडा रंगण्याची चिन्हे आहेत. 

Tags : Dhumshan Congress candidature ,belgaon news