Fri, Apr 26, 2019 16:16होमपेज › Belgaon › सैन्य भरतीच्या नावाखाली फसवणूक

सैन्य भरतीच्या नावाखाली फसवणूक

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 10:35PMबेळगाव : प्रतिनिधी

सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली अनेक तोतया माजी सैन्याधिकार्‍यांनी युवकांना फसविण्याचा धंदा चालविला आहे. युवकांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवूून पैसे उकळले जात असल्यामुळे प्रमाणित प्रशिक्षण संस्था कोणत्या आणि नकली कोणत्या, याची माहिती भरतेच्छुकांनी घेणे गरजेचे आहे.

बागलकोमध्ये गेल्या आठवड्यात युवकांना सैन्य भरतीचे आश्‍वासन देऊन फसवणूक करणार्‍या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या तोतयाने आपला पत्ता कणबर्गी असा सांगितला होता.

बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी, विजापूर, मुधोळ, कारवार परिसरातील युवकांचा सैन्यात भरती होण्याचा कल वाढत आहे. याचा गैरफायदा अशा बनावट प्रशिक्षण केंद्रांकडून घेतला जात आहे. युवकांना खोटी माहिती पुरवून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात येत आहेत. यामध्ये फसगत होणार्‍यांची संख्या अधिक आहे.

सध्या सरकारी व खासगी क्षेत्रात नोकर्‍यांची वानवा आहे. उच्च शिक्षण घेेऊनदेखील नोकर्‍या मिळणे अवघड झाले आहे. यामुळे युवकांकडून सैन्य भरतीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र याच गरजेचा गैरफायदा काही संस्था तसेच एजंट घेऊ लागले आहेत.

आठ केंद्रे, प्रमाणित किती?

बेळगावात मोठ्या प्रमाणात भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांचा सुळसुळाट झाला आहे. एखाद्या घरात यासाठी कार्यालय सुरू करण्यात येते. गरजू युवकांना एजंटच्या माध्यमातून या केंद्रात दाखल करण्यात येते.
या ठिकाणी एखाद्या निवृत सैनिकाच्या माध्यमातून जुजबी माहिती देण्यात येते. काही काळ प्रशिक्षण देण्यात येते. यानंतर भरतीसाठी युवकांना उभे करण्यात येते. बेळगाव शहर आणि परिसरात या प्रकारे सात ते आठ प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आणि जागा उपलब्ध नाही. प्रशासकीय परवानगी नाही. यामुळे यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.