Thu, Apr 25, 2019 03:33होमपेज › Belgaon › स्वस्त पेट्रोलसाठी महाराष्ट्रवासीय सीमाभागात

स्वस्त पेट्रोलसाठी महाराष्ट्रवासीय सीमाभागात

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:02AMबेळगाव : प्रतिनिधी

देशामध्ये महाराष्ट्रात इंधनाचे  दर सर्वाधिक असून कोल्हापूरचे दर अधिक आहेत. महाराष्ट्र सरकारने इंधनावर स्थानिक करासह दुष्काळी करही लादल्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पेट्रोल दरात तब्बल 8 रुपये व डिझेल दरात 3 रुपयांचा फरक आहे. यामुळे सीमेवरील महाराष्ट्रवासीय कर्नाटकात जवळ असणार्‍या पंपावर इंंधन खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यामुळे सीमेवरील महाराष्ट्र पेट्रोल पंपांना रोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. 

सीमेवरील पंपाना लाखोचा फटका

महाराष्ट्र - कर्नाटक हद्दीपासून महाराष्ट्रातील 25 कि.मी.वरील  शेकडो पेट्रोल पंपांवर इंधनाच्या  मागणीत घट झाली आहे. याउलट जवळ असणार्‍या कर्नाटकातील पंपावर इंधनाची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती निर्माण झाल्याने एकेका पंपचालकाला महिन्याकाठी दीड ते चार  लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शिनोळीपासून कोल्हापूर शहरापर्यंत सीमेवरील महाराष्ट्राचे सुमारे 25 पेट्रोलपंप आहेत. या सर्व पंपांच्या व्यवस्थापनाचे अर्थकारण कोलमडले आहे. काही चालकांनी कामगार कपात केली आहे तर काही चालक पंपच बंद ठेवण्याच्या विचारात आहेत. 

महाराष्ट्र अर्थमत्र्यांना निवेदन

इंधन दरातील तफावतीमुळे सीमेवरील महाराष्ट्र पेट्रोल पंप चालकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही हालचाल सुरू नसल्याचे शिनोळी येथील पंपचालक व शिवसेना कोल्हापूरचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी सांगितले. 

11 महिन्यात दरात 8.50 रुपये वाढ

जून 2017 मध्ये देशभर दररोज पेट्रोल व डिझेलचे दर बदलण्याची घोषणा केंद्र सरकार व पेट्रोलियम कंपन्यांनी घेतली. या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिक दरवाढीमुळे होरपळून गेले आहेत. हा निर्णय होण्याआधी महाराष्ट्रातील पेट्रोल दर 77 व डिझेल दर 60 रु. प्रतिलिटर होता. मात्र हळूहळू हा दर वाढत जाऊन गेल्या 11 महिन्यात पेट्रोल दरात 8.30 रुपये तर डिझेल दरात 12.50 रुपयांची वाढ झाली 
आहे. 

महाराष्ट्रात दर जास्त

देशातील सर्व राज्यांत महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर उच्चांकी आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षाही महाराष्ट्रात सरासरी 4 ते 8 रुपयापर्यंत पेट्रोलचे दर जास्त आहेत.