Fri, Apr 19, 2019 12:47होमपेज › Belgaon › सवितामुळे आयर्लंडच्या १५५ वर्षे जुन्या कायद्यात बदल

सवितामुळे आयर्लंडच्या १५५ वर्षे जुन्या कायद्यात बदल

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 27 2018 8:08AMबेळगाव, डब्लीन : वृत्तसंस्था

बेळगावची कन्या डॉ. सविता हलप्पन्नवरमुळे अखेर आयर्लंडच्या कायद्यात बदल होणार आहे. गर्भपातावर बंदी घालणारा 155 वर्षे जुना कायदा आयर्लंडमध्ये आता रद्दबातल ठरणार असून, तेथील जनतेने गर्भपात कायदेशीर करावा, असा कौल दिला आहे. डॉ. सविता जे जिवंतपणी करू शकली नाही, ते तिच्या मृत्यूने साध्य होणार आहे. पण त्यासाठी सहा वर्षांचा लढा द्यावा लागला. 

आयर्लंडमध्ये गर्भपाताला बंदी होती. मातेचा जीव धोक्यात आला तरीही गर्भपात करणे हा गुन्हा होता. त्यामुळे गर्भाशयात गुंतागुंत निर्माण होऊनही गर्भपात न केल्यामुळे मूळच्या बेळगावच्या असलेल्या डॉ. सविता हालप्पन्नावर यांचा 28 ऑक्टोबर 2012 रोजी आयर्लंडमध्ये मृत्यू झाला. 

सविताच्या मृत्यूनंतर आयरिश जनता तसेच इतर देशांमध्येही निदर्शने झाली. त्यानंतर आयर्लंडने शुक्रवारी 25 मे रोजी गर्भपातबंदी कायदा रद्द करावा की नको, यावर मतदान घेतले. सुमारे 60 टक्के म्हणजे 20 लाख लोकांनी मतदान केले होते. शनिवारी सायंकाळनंतर मतमोजणीला सुरवात झाली. सुमारे 66.4 टक्के लोकांनी कायदा रद्द करावा, असा कौल दिला आहे. त्यामुळे आता आयर्लंडमध्ये जुना कायदा रद्द होऊन नवा कायदा अस्तित्वात येईल.

नव्या कायद्यानुसार 12 आठवड्यापर्यंतचा गर्भ महिलेला काढून टाकण्याची मुभा असेल. तर त्यानंतरही गुंतागुंत निर्माण झाल्यास गर्भपाताची संधी महिलेला असेल.  जुन्या कायद्यात गर्भपाताची कोणतीच मुभा नव्हती. त्यामुळेच डॉ. सविताचा मृत्यू झाला होता. 

पहिला निकाल गालवे कौंटीचा

शनिवारी निकाल जाहीर करण्यात आला. सर्वप्रथम गालवे पूर्व मतदारसंघाचा निकाल लागला. 60.2 टक्के लोकांनी कायदा रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले. तर 38.8 टक्के लोकांनी विरोधात मतदान केले. याच परिसरातील रूग्णालयात सविता हालप्पनवर यांचा मृत्यू झाला होता. 

उपलब्ध सारेच मतदारसंघ विरोधात

डब्लीन सेंट्रलमध्ये 76.5, दक्षिणेतील मतदारसंघांमध्ये 64 ते 69 टक्के मतदान कायद्याविरोधात झाले. सायंकाळी 8 पर्यंत चाळीसपैकी अकरा मतदारसंघांतील निकाल जाहीर झाला. सर्व अकरा मतदारसंघांत मतदारांनी कायद्याला विरोध केला.

एक्झिट पोल खरा

निकाल जाहीर होण्याआधी इक्झिट पोलने कायद्याविरोधात 70-30 असा निकाल लागणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला. हा अंदाज अखेर खरा ठरला. दरम्यान, मतदानादिवशी आयर्लंडपासून शेकडो कि. मी. दूरवर असलेले मतदार स्वगृही परतले. मतदानासाठी रजा घेऊन घरी जात असल्याचे संदेश अनेकांनी सोशल मीडियावर टाकले. तर काही महिलांनी गर्भपात नियंत्रण कायद्यामुळे भोगाव्या लागलेल्या समस्या ट्वीटरवरून कथन केल्या.

बेळगावच्या घरी गर्दी

सविता हालप्पनवर बेळगावची कन्या असल्याने त्यांच्या श्रीनगर येथील घरामध्ये शनिवारी अनेकांनी गर्दी केली. लढ्याला यश मिळाल्याबद्दल वडील अंदानप्पा अणि आई अक्‍कमहादेवी याळगी यांचे अभिनंदन करण्यात आले. बेळगावसह महाराष्ट्रातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही याळगी कुटुंबीयांचे मत जाणून घेतले.

आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी गुरूवारी मतदानाआधी गर्भपातविरोधी कायद्यात बदल करण्यासाठी ‘येस’ असे मतदान करण्याचे आवाहन केले होते. आयर्लंडमधील गर्भपाताच्या बाबतीत काही आकडेवारीही त्यांनी सादर केली. आयर्लंडमध्ये दररोज तीन महिला गर्भपाताच्या गोळ्या घेतात. (या गोळ्या त्या बेकायदेशीरपणे ऑनलाईन मागवतात.) तर दररोज नऊ महिला गर्भपातासाठी देशाबाहेर जातात. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणारा बेकायदा गर्भपात गरज असताना कायदेशीर करणे शक्य असून जास्तीतजास्त सकारात्मक मतदान झाल्यास कायद्यात निश्‍चितपणे बदल करण्यात येणार असल्याचे वराडकर यांनी म्हटले होते. वराडकर स्वतः निमभारतीय आहेत. त्यांचे वडील भारतीय, तर आई आयरिश आहे.