होमपेज › Belgaon › मजगाव मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवले चांद्रयान

मजगाव मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवले चांद्रयान

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:42PMबेळगाव : प्रतिनिधी 

मजगाव येथील प्राथमिक सरकारी मराठी शाळा क्र. 35 येथे विज्ञान दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पहिली ते सातवी विद्यार्थ्यांनी चांदयानासह विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन सादर करुन वाहवा मिळविली.

विद्यार्थ्यांनी सादर कलेल्या या प्रदर्शनामध्ये हेलिकॅप्टर, विविध प्रकारची विमाने होतीच, शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून मनुष्याने कसे जगावे, कोणत्या आहाराचे सेवन करावे, फळे, पालेभाजी आदींचा उपयोग आपल्या जीवनात कसा करावा, याची आकर्षित मांडणी करुन त्याचे प्रात्यक्षिकही सादर केले याशिवाय याठिकाणी आलेल्या सर्वांना याची उत्कृष्टरित्या माहितीही दिली. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक वर्धमान गंगाई आणि माजी नगरसेवक अ‍ॅड. नागेश सातेरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला बेळगाव स्मालस्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष उमेश शर्मा, रोटरी क्‍लब बेळगावचे प्रदीप कुलकर्णी, उद्योजक अनिल सांबरेकर, सोमनाथ जयाण्णाचे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार केल्या जातात याचे प्रत्यंतर आपणाला आले असून विद्यार्थ्यांचे हे कौशल्य उद्योजकांना प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोदगार उमेश शर्मा यांनी काढले. या प्रसंगी किसन सुतार, केदारनाथ सुतार, प्रसाद काकतकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रुपेश बांडगी, हिरामणी अनगोळकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना परितोषिकांचे वितरण करुन मिठाईचे वाटप करण्यात आले.मुख्याध्यापिका एम. डी. शिंदे यांनी स्वागत तर. सूत्रसंचालन नूतन कडलीकर यांनी केले. आभार एम. डी. शिंदे यांनी मानले.