Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › Belgaon › चंद्रकांत पाटील गायले कर्नाटक स्तुती गीत; सीमाभागात संताप (Video)

चंद्रकांत पाटील गायले कर्नाटक स्तुती गीत; सीमाभागात संताप (Video)

Published On: Jan 21 2018 4:51PM | Last Updated: Jan 21 2018 7:37PMबेळगाव  : प्रतिनिधी

‘हुट्टीदरे कन्‍नड नाडे हुट्ट बेकु’ अर्थात ‘जन्म झाला तर कन्‍नड भूमीतच व्हावा’ हे कन्‍नड गीत सीमाप्रश्‍नाचे समन्वयक मंत्री आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद‍्धृत करून रविवारी सीमावासीयांचा रोष ओढवून घेतला. मराठी भाषिकांवर कर्नाटकी अत्याचार वाढत असताना पाटील यांनी त्यावर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका सीमाभागातून होत आहे. गोकाक तालुक्यातील तवग या गावात दुर्गादेवी मंदिराचे उद्घाटन शनिवारी रात्री झाले. फित कापल्यानंतर  आपल्या भाषणाची सुरुवातच कन्‍नड गीताने केली.

त्यांना त्या ओळी लिहून देण्यात आल्या होत्या. त्या ओळी त्यांनी गाताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर  पाटील  भाषाबांधव्याबद्दल बोलले. भाषेवरून वाद होणे चुकीचे आहे. सार्‍या भाषिकांनी सौहार्दतेने राहावे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप-सेना युती सरकार आल्यानंतर सीमाप्रश्‍नाच्या पाठपुराव्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सीमाप्रश्‍नी समन्वयकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

गेल्या तीन वर्षांच्या काळात चंद्रकांत पाटील यांना सीमावासीयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावला येणे जमलेले नाही; पण गोकाकला जाऊन कन्‍नडप्रेम कसे दाखवता आले, अशीही टीका होत आहे. मंदिर उद्घाटनाला बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळीही उपस्थित होते.  त्यांनी लगेच पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

गोकाकमध्ये कशासाठी?

गोकाकमधील तवग गावातील यल्‍लाप्पा पाथरुड हा युवक कोल्हापूरमध्ये राहतो. तो चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. त्याने तवगमधील युवक व समाज बांधवांनी एकत्र येऊन गावात दुर्गादेवीचे दगडी मंदिर बांधले. मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील तवगमध्ये आले होते. कन्‍नडमधील ओळी मराठीत लिहून घेतल्या : ना. पाटील या वादाबाबत बोलताना ना. पाटील म्हणाले, यल्‍लाप्पा गाडीवड्डर हा आपल्या घरी लहानपणापासून राहतो, तो आमच्या घरातील मुलासारखाच आहे.

यल्‍लाप्पा याच्या तवग (ता. गोकाक, जि. बेळगाव) या गावात दुर्गामातेचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमास निमंत्रित केल्याने गेलो होतो. त्या गावात बहुतांश कन्‍नड भाषिक आहेत. यामुळे कार्यक्रमात बोलताना कन्‍नड भाषेतून सुरुवात करावी, दुर्गामाता ही आदिमाया आदिशक्‍ती आहे, हे आणि व्यासपीठावरील प्रमुखांची माहिती कन्‍नडमधून सांगावी म्हणून कन्‍नडमधील चार ओळी मराठी शब्दांत लिहून घेतल्या आणि त्या वाचल्या, त्यानंतर पुढील पंधरा मिनिटे हिंदीमध्ये भाषण केले. त्यात ग्रामविकास या विषयावर विवेचन केले. आता कन्‍नड भाषिक नातेवाईकांच्या गावी, त्यांच्या कार्यक्रमाला जायचे की नाही, असा सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला.

संबधित बातम्याः-

कन्नड भाषिक गाव असल्यामुळेच कन्नड बोललो : चंद्रकांत पाटील  

चंद्रकांतदादांनी सीमावासीयांच्या पाठीत खंजीर खूपसला : मुंडे